Osmanabad: नामांतरावरून काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीत राजीनामा सत्र; उस्मानाबादेत 40 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
Osmanabad News: उद्या जिल्हाभरातील आणखी काही पदाधिकारी राजीनामे देणार आहेत.
NCP Workers Resigned In Osmanabad: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या शेवटच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मुस्लीम कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे. तर याच नामांतरावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत राजीनामा सत्र पाहायला मिळत आहे. उस्मानाबादेत राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचा विरोध करत आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत नामांतराला विरोध केला नाही म्हणून, गुरुवारी औरंगाबाद आणि परभणी येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यांनतर आज उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवले आहेत. ज्यात राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक प्रदेश सचिव मसुद शेख, जिल्हा अध्यक्ष, शहराध्यक्षसह पाच नगरसेवकांचा सुद्धा समावेश आहे. तसेच उद्या जिल्हाभरातील आणखी काही पदाधिकारी सुद्धा राजीनामे देणार आहेत.
काँग्रेसच्या 200 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराला मंत्रीमंडळाच्या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोणताही विरोध करण्यात आला नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केलं आहे. त्यामुळे औरंगाबादच्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. तर काँग्रेसचे औरंगाबाद शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.शहरातील काही माजी नगरसेवक आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच काल दिवसभरात काँग्रेच्या 200 पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
Aurangabad: ठाकरे सरकारने नामांतराचा घेतलेला निर्णय अवैध; फडणवीस यांनी सांगितली कायदेशीर प्रक्रिया
हिंगोलीत पडसाद..
औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराचे पडसाद आता हिंगोली जिल्ह्यात सुद्धा पाहायला मिळत आहे. कारण हिंगोलीच्या अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हिंगोली जिल्ह्यातील मुस्लिम काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सामूहिक राजीनामे पाठवले आहेत. नामांतराचा निर्णय घेत असताना काँग्रेसच्या मंत्र्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने हे राजीनामे देत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. हिंगोली जिल्ह्यातील 50 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या त्या एका निर्णयाने काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप आला आहे.