नवी मुंबई अल्पवयीन मुलांचं बेपत्ता प्रकरण; मुलांचं अपहरण झालेलं नाही, ती रागात घरातून निघून गेलीत, पोलिसांची माहिती
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकाच दिवशी अपहरणाचे सात गुन्हे दाखल झाले आहेत. यात 5 मुली आणि 3 मुले असे एकूण 8 जण बेपत्ता असून त्यातील 6 जणांचा शोध लागलाय तर दोघांचा तपास सुरु आहे.

Navi Mumbai News Updates: नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai News) 8 अल्पवयीन बेपत्ता मुलांपैकी (Missing Children) सहा जणांना शोधण्यात यश आलं आहे. तर दोघांचा तपास सुरू आहे. दरम्यान, मुलांचं अपहरण झालं नसून ते रागावल्यानं घरातून पळून गेल्याची माहिती पोलिसांनी (Navi Mumbai Police) दिली आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकाच दिवशी अपहरणाचे सात गुन्हे दाखल (Case Filed) झाले आणि संपूर्ण शहरात खळबळ माजली. वृत्त वाऱ्यासारखं पसरलं आणि शहर हादरलं. यात 5 मुली आणि 3 मुलं अशी एकूण 8 अल्पवयीन मुलं बेपत्ता होती. त्यातील 6 जणांचा शोध लागला आहे. तर दोघाबाबात अद्याप कोणतीही माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. दोन मुलांचा शोध पोलिसांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे.
गेल्या 11 महिन्यांत 371 मुलं बेपत्ता
नवी मुंबई क्षेत्रात मागील 11 महिन्यांत एकूण 371 मुलं बेपत्ता झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. यातील 325 प्रकरण सोडवण्यात नवी मुंबई पोलीसांना यश आलं आहे. याप्रकरणी सापडलेले सहा जण घरातून रागावून किंवा बाहेर फिरण्यासाठी म्हणून गेले होते, अशी माहिती कुटुंबीयांची चौकशी केल्यानंतर समोर आली आहे. दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांच्याशी संवाद साधावा, असं आवाहन नवी मुंबई पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी केलं आहे.
आठपैकी सहाजण सापडले, दोघे अजून बेपत्ता
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात एकाच दिवशी अपहरणाचे सात गुन्हे दाखल झाले. त्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली. सात जणांपैकी सहा मुंलांचा शोध लागला, मात्र अद्याप दोघांचा शोध सुरू आहे. बेपत्ता झालेली सर्व मुलं अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोपरखैरणे पोलीस ठाणे अंतर्गत मिसिंग झालेला 12 वर्षांचा मुलगा प्रज्वल पाटील ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आला. याच भागातून मिसिंग झालेला आयान खानसुद्धा सापडला. तर रबाळे पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हा नोंद प्रकरणातील 13 वर्षाची मुलगी अनुष्का राजभर ऐरोली परिसरात आढळून आली. कामोठे परिसरातून गायब झालेली अंतरा विचारे हिचा मोबाईलद्वारे तपास केला असता ती गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली, पोलिसांनी तात्काळ पथक पाठवून तिला ताब्यात घेतलं. तर, कळंबोली येथील आरती वाल्मिकी आणि दिव्या गुप्ता या दोघी जीवदानी मंदीरात गेल्या होत्या. दरम्यान, रबाळे आणि पनवेल येथून मिसिंग असलेल्या दोन मुलींचा तपास सध्या सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
