Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्यावर आयुष्यातील पहिला गुन्हा दाखल, निमित्त ठरले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे आणि 70 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेऊ असं अमित ठाकरे म्हणाले.

नवी मुंबई : मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर नवी मुंबईतील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नेरुळमधील चार महिने झाकून असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे (Chhatrapati Shivaji Maharaj Statue) परवानगी न घेता अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरे आणि त्यांच्यासोबतच्या 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित ठाकरे यांच्यावर दाखल झालेला हा आतापर्यंतचा पहिलाच गुन्हा आहे.
नवी मुंबईच्या नेरुळमध्ये राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतिक्षेत तसाच झाकून ठेवलेल्या अवस्थेत होता. अमित ठाकरेंना ही बाब समजताच त्यांनी परवानगी न घेता त्या पुतळ्याचं अनावरण केलं. याच प्रकरणात त्यांच्यावर आणि 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Navi Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Statue : चार महिन्यांपासून पुतळा झाकून
नवी मुंबईतील कौपरखैरणे येथे मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी अमित ठाकरे आले होते. त्यावेळी त्यांना महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ मनसैनिकांच्या मदतीने पोलिसांच्या डोळ्यादेखत पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी मनसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं.
Amit Thackeray News : केस दाखल झाली तर आनंदच आहे
याबाबत बोलताना अमित ठाकरे म्हणाले होते की, "मी शाखा उद्घटनाच्या कार्यक्रमासाठी या भागात आलो होतो. दरम्यान, मला असं कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा गेल्या चार महिन्यांपासून तयार आहे. त्यावर आता धूळ साचत आहे. हा पुतळा लोकांच्या मागणीवरून, लोकांसाठी झाला आहे. मात्र सरकारमधल्या कुठल्याही नेत्याला अथवा मंत्र्याला महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करायला वेळ मिळत नसल्याचे दिसतंय. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून हे स्मारक धूळ खात पडलं आहे. त्यावर धूळ जमतेय, मला ते बघवलं नाही. म्हणून मी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलं."
गेल्या चार महिन्यात अनेक नेते, मंत्री नवी मुंबईत आले आहेत. अगदी पंतप्रधान मोदी नवी मुंबईत विमानतळ उद्घटनासाठी आले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येऊन गेलेत. दहिहंडी, पक्ष प्रेवशाच्या वेळी येऊन गेलेत. मात्र ज्यांना आपण आराध्य दैवत मानतो त्या छत्रपतींसाठी त्यांना वेळ मिळत नसेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे. मला हे बघवलं गेले नाही. महाराजांना कपड्यात बांधून ठेवल्याचे मनसे सैनिकांना आणि नवी मुंबईकरांना बघवलं नाही. म्हणून आज आम्ही महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केलं, असेही अमित ठाकरे यावेळी म्हणाले.
या कृत्यासाठी माझ्यावर कारवाई होत असेल तर ही माझ्या आयुष्यातील पहिली केस असेल. मात्र वेळ आली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेवू, असा पवित्रा अमित ठाकरेंनी घेतला होता.
ही बातमी वाचा:
























