(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sasoon Hospital Drug Racket : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो व्हायरल; शिदे-ठाकरे गटाकडून आरोप-प्रत्यारोप सुरु
ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या फोटोची चौकशी करा, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे.
नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचे (Sasoon Hospital Drug Racket) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे या फोटोची चौकशी करा, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. तर दुसरीकडे फोटोत दिसणारे दादा भुसे यांनीच ललित पाटीलला मातोश्रीवर आणलं होतं, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे या फोटोवरुन आता राजकारण चांगलंच तापलं आहे.
ललित पाटील फरार प्रकरणात आता राजकीय नेत्यांनी आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे. ललित पाटील फरार होण्यामागे शिंदे गटाच्या दादा भुसेंचा हात असल्याचा खळबळजनक आरोप ठाकरे गटाने केला आहे. या सगळ्यासंदर्भातील पुराने सादर करा, असं स्पष्टीकरण शिंदे गटाच्या दादा भुसेंनी दिलं आहे.
फोटोची चौकशी करा....
शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी या फोटोची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुषमा अंधारेंनी हे फोटो बघावे आणि त्यांनी या संदर्भात आमच्या पालकमंत्र्यांवर चुकीचे आरोप करु नये. असे आरोप करण्याचा अंधारेंकडे कोणताही अधिकार नाही. या फोटोत दिसणारे पदाधिकारी यांची चौकशी आधी करा आणि मग दादा भुसेंचं नाव घ्या. पदाधिकारी आणि बाकी कार्यकर्त्यांचे ललित पाटीलशी कोणते संबंध आहे. याची माहिती घेण्यासाठी अंधारेंनी पत्र द्यावं आणि त्यांची चौकशी करावी, असं ते म्हणाले आहे.
ललित पाटीलच्या पक्षप्रवेशाचा फोटो
शिंदे आणि ठाकरे गटाकडून हा फोटो व्हायरल केला जात आहे. हे सगळे व्हायरल करण्यात आलेले फोटो 2018 च्या दरम्यानचे आहेत. त्यावेळी ललित पाटील हा शिवसेनेत दाखल झाला होता. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीच्या प्रचार रॅलीतदेखील तो होता. या फोटोत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप दिसत आहेत आणि काही फोटोत उद्धव ठाकरे यांच्यासोबत दादा भुसेंच्या उपस्थित प्रवेश केला तेव्हाचे हे फोटो असल्याचं दिसत आहे.
दोन्ही गटाकडून आरोप प्रत्यारोप...
हा फोटो समोर आल्यानंतर दोन्ही गटाचे नेते हात झटकताना दिसत आहे. एखाद्याला पक्षात प्रवेश करायचा असेल तर त्यासाठी आम्ही कोणाला रोखू शकत नाही, अशी भूमिका दोन्ही गटाच्या नेत्यांनी घेतली आहे. या फोटोंमुळे आता नाशिकचं राजकारण चांगलंच पेटताना दिसत आहे. याच प्रकरणी शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट एकमेकांना चिकलफेक करताना दिसत आहे.
इतर महत्वाची बातमी-