Nashik News : चार वर्षे रस्ते महामंडळात, त्यामुळे नाशिकचे रस्ते 'ओकेच' होणार, नवनियुक्त मनपा आयुक्तांचा विश्वास
समृद्धी महामार्गावर भरभरून बोलले. ते म्हणाले समृद्धी महामार्ग हा रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण झाला आहे. सात महिन्यात एक हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले आहे.
नाशिक : गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्र रस्ते महामंडळात कार्यरत होतो. त्यामुळे रस्त्यांची बाबतीत योग्य निर्णय घेऊन नाशिकचे रस्ते नागरीकस्नेही करण्यावर भर असेल असा विश्वास नाशिक मनपाचे नवनियुक्त आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडावर यांनी व्यक्त केला आहे.
तत्कालीन मनपा आयुक्त रमेश पवार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागेवर डॉ. पुलकुंडावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी डॉ. पुलकुंडावर यांनी नाशिकच्या मनपा आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, नाशिकच्या मनपा आयुक्तपदी सूत्रे स्वीकारली आहेत. पूढील दोन दिवसांत काय करायचं तर निवडणूक प्रक्रियेतील ओबीसी आरक्षण सोडत संदर्भातील नियोजन करणार आहे. त्यानंतर नाशिक मनपाच्या अखत्यारीत जे जे विषय असतील, ते सर्व कामे करण्यात येतील. नाशिकच्या नागरिकांचे आपण सर्व देणं लागतो. त्यामुळे टीमवर्क म्हणून काम पार पाडुया, नागरिकांना जे मनपाकडून देणं अपेक्षित ते ते देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
तसेच येत्या काही दिवसांत संपूर्ण नाशिक शहर फिरणार असून सर्व अधिकाऱ्यांची चर्चा करून हे काम मार्गी लावणार आहे. शहरातील दुरुस्तीची कामे, नवीन कामे प्राधान्याने मनपाकडून करण्यात येतील, मीडियाचे सहकार्य अपेक्षित असून प्रशासन आणि मीडिया यांच्या नाशिकचा विकास साधता येईल, असेही ते म्हणाले.
आयुक्तांकडून समृद्धी महामार्गाचे कौतुक
नवनियुक्त आयुक्त डॉ. पुलकुंडावर यांनी यावेळी समृद्धी महामार्गावर भरभरून बोलले. ते म्हणाले समृद्धी महामार्ग हा रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण झाला आहे. सात महिन्यात एक हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले आहे. एवढ्या जलद गतीने काम समृध्द महामार्गाचे झाले. नाशिकमधून समृद्धी महामार्गासाठी विरोध झाला, प्रशासनाने पाच पट रक्कम दिली, त्यानंतर शेतकऱ्यांचा विरोध मावळला. समृद्धी महामार्ग हा देशासाठी दीपस्तंभा सारखा आहे. त्यानंतर रस्ते महामंडळ सांभाळू शकलो, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.
मातोश्रीच्या प्रश्नांवर बोलणे टाळले!
यावेळी आयुक्तांना मातोश्री संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. मात्र या प्रश्नावर त्यांनी बोलण्याचे टाळले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी रमेश पवार यांची नियुक्ती केली होती. उद्धव ठाकरे यांचे पवार हे निकट वर्तीय असल्याचे सांगण्यात येत होते. तर आता पवार यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मनपा आयुक्तपदी डॉ. पुलकुंडावर यांची नियुक्ती करण्यात आली. डॉ. पुलकुंडावर हे शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे.























