(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : दुर्दैवी! पाण्याच्या प्रवाहात बैलगाडी उलटून महिलेसह मुलीचा मृत्यू, नांदगाव तालुक्यातील घटना
Nashik News : मुसळधार पावसात महिलेसह दोन मुली बैलगाडीने घरी परतत असताना पाण्याच्या प्रवाहात बैलगाडी उलटून तिघीही वाहून गेल्याची धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यातील बोलठाण परिसरात घडली.
Nashik News : नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र या मुसळधार पावसात महिलेसह दोन मुली बैलगाडीने घरी परतत असताना बैलगाडी उलटून तिघीही वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोघींचा मृत्यू झाला असून एका मुलीचा शोध सुरु आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात काल (24 जून) पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांना दिलासा दिला. बोलठाण परिसरात शेतकरी घरी परतत असताना बैलगाडीत बसलेल्या एका मजूर महिलेसह दोन चुलत बहिणी वाहून गेल्या आहेत. यापैकी शेतमजूर महिलेसह एका मुलीचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मुलीचा शोध घेतला जात आहे.
नांदगाव तालुक्यातील जातेगाव परिसरात काल दुपारी मुसळधार पाऊस झाला. यावेळी आडगाव (ता. कन्नड जि. औरंगाबाद) येथील शेतमजूर काम आटोपून घराकडे निघाले होते. यावेळी जातेगाव जवळील खारी नदीच्या मार्गातून घरी जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. शेतमजुरांना पाण्याचा अंदाज न आल्याने बैलगाडी पाण्यात उलटली. या पाण्याच्या प्रवाहात सापडलेल्या पाच मजुरांची कशी बशी सुटका करण्यात आली. परंतु मिनाबाई बहिरव, साक्षी सोनवणे, पूजा सोनवणे या पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्या.
दरम्यान मिनाबाई आणि साक्षी यांचे मृतदेह सापडले असून पूजा दिनकर सोनवणे हिचा शोध सुरु आहे. मात्र सदर घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
परिसरात हळहळ
सध्या पूजा हिचा शोध घेण्याचे काम सुरु असून दोघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलीस नाईक अनिल गांगुर्डे यांनी सांगितले. मागील वर्षीही परिसरात बैल गाडी उलटून बैल दगावले होते. त्यामुळे सदर ठिकाणी पुलाची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे.