Nashik Mahajyoti : यूपीएससी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण आहात? महाज्योतीकडून मिळणार 50 हजार रुपयांचं अर्थसहाय्य, असा करा अर्ज
Nashik News : आता महाज्योतीतर्फे (Mahajyoti) यूपीएससीच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 50 हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.
Nashik Mahajyoti : यूपीएससीच्या पूर्व परीक्षेत (UPSC Prelims) उत्तीर्ण झालेल्या आणि मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती, विमुक्त जमाती या विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांना आता महाज्योतीतर्फे (Mahajyoti) मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. त्यानुसार राज्यातील तब्बल 68 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार असून नाशिक जिल्ह्यातील 15 विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने यूपीएससी (UPSC) महाराष्ट्रातील ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी विविध योजना सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रथम स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची योजना सुरू केल्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेतही चांगले यश मिळवले. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे या उमेदवारांना मुख्य परीक्षेची योग्य तयारी करण्यासाठी तसेच मुलाखतीसाठी चांगल्या सुविधा नसल्याची बाब समोर आले आहे.
त्यानुसार महाज्योतीने प्रथम पूर्व आणि मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना एकरकमी 25000 रुपयांचे अर्थसहाय्य करण्याची योजना सुरू केली होती. तत्पूर्वी मुख्य परीक्षेला पात्र ठरलेल्या उमेदवारांना 15 हजार रुपये देण्याचा ठराव झाला होता. पण मागणीनंतर त्यात बदल करत पन्नास हजार रुपये देण्याचे महाज्योती कडून सांगण्यात आले आहे. तसेच आधी ठरल्यानुसार मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्यांना स्वतंत्र एक रकमे पंचवीस हजार रुपये देणार असल्याचे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी सांगितले.
नाशिकच्या 15 विद्यार्थ्यांना लाभ
दरम्यान नाशिक (Nashik) येथून अनेक विद्यार्थी एमपीएससी-यूपीएससी (MPSC) या स्पर्धा परीक्षा देत असतात. यातील अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातून असल्याने अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे महाज्योतीने याबाबत देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केवळ मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्यांना 25000 रुपये दिले जात होते. आता पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्याना अर्थसहाय्य दिले जाणार आहे. नाशिक विभागातील पंधरा उमेदवारांना याचा लाभ मिळणार असल्याचे महाज्योतीच्या प्रादेशिक अधिकारी सुवर्णा पगार यांनी सांगितले.
3 जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी
दरम्यान अशा विद्यार्थ्यांना जर महाजोतीच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावयाचा आहे. अँप्लीकेशन इन्व्हाईटेड फॉर फायनान्शियल असिस्टंट क्वालीफाईड फॉर यूपीएससी मेन्स 2023 यावर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करण्याची मुदत 3 जुलैपर्यंत आहे. दरम्यान आतापर्यंत महाज्योतीने प्रशिक्षणासह अर्थसहाय्य केलेले अकरा उमेदवार यंदाच्या यूपीएससीत उत्तीर्ण झाले आहेत. आता महाज्योतीने केवळ मुलाखतीसाठी पात्र ठरलेलेच नव्हे तर पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना देखील एकरकमी अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र या योजनेच्या लाभासाठी उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा अशी पात्रता आहे.
ही बातमी वाचा: