(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रेल्वेत नोकरीचं आमिष दाखवत 18 लाखांची फसवणूक, नाशिकमधील पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल
रेल्वेच्या वेबसाईटवर नियुक्ती झाल्याचं नाव येताच ते लगेच गायब कस झालं? रेल्वेच्या शिक्क्यासह इतर नोंदी असलेले नियुक्ती पत्र बाबाजी यांना कसे मिळाले? रेल्वेचे काही अधिकारीही यात सहभागी आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
नाशिक : रेल्वेत भरती करून देतो असं सांगत एका मामा आणि भाच्याची 18 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकमध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे रेल्वेत भरती करून देणारे एक रॅकेटच कार्यरत आहे का? हा प्रश्न या संपूर्ण प्रकारामुळे उपस्थित होत आहे.
नाशिकच्या पंचवटी परिसरात बाबाजी केदारे राहतात. नोकरीच्या शोधात असतानाच रमेश गोसावी या ओळखीच्या पोलिस कर्मचाऱ्याशी नोव्हेबर 2014 साली त्यांची भेट झाली आणि बाबाजी यांच्यासह त्यांच्या भाच्याला रेल्वेत भरती करून देण्याचे आमिष दाखवत दोघांकडून गोसावीने 18 लाख रुपये उकळले. काही दिवसांनी बाबाजी यांना गोसावीने कोलकत्याला जाण्यास सांगितले. तिथे जाताच एका खाजगी लॅबमध्ये त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली त्यानंतर त्यांना नियुक्तीच पत्र तर मिळालच सोबतच तीन महिन्यांनी रेल्वेच्या वेबसाईटवर त्यांची नियुक्ती झाल्याबाबत नावही आलं. मात्र दोन अडीच महिन्यांनी अचानक वेबासाईटवरील नाव गायब झाले. यानंतर बाबाजी यांना शंका येताच रमेश गोसावीकडे त्यांनी विचारणा करत पैशांची वारंवार मागणी केली. मात्र त्यांना ना पैसे मिळाले ना नोकरी. विशेष म्हणजे पैशांच्या बदल्यात गोसावीने सचिन म्हस्के नावाच्या एका मित्राचा फ्लॅट बाबाजी यांना नावावर करून देण्याचं सांगितल. मात्र तो फ्लॅटही भलत्याच्याच नावावर असल्याचं समोर आलं.
एकंदरीतच आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच बाबाजी यांनी थेट पंचवटी पोलिस ठाणे गाठलं आणि रमेश गोसावीसह सचिन म्हस्के विरोधात त्यांनी गुन्हा दाखल केला. रेल्वेच्या वेबसाईटवर नियुक्ती झाल्याचं नाव येताच ते लगेच गायब कस झालं? रेल्वेच्या शिक्क्यासह इतर नोंदी असलेले नियुक्ती पत्र बाबाजी यांना कसे मिळाले? रेल्वेचे काही अधिकारीही यात सहभागी आहेत का? रमेश गोसावीने आजपर्यंत किती जणांची अशाप्रकारे फसवणूक केलीय? रमेश गोसावी हा नाशिक शहर वाहतूक पोलीस ठाण्यातच कार्यरत असल्याने हे संपूर्ण प्रकरण दडपण्याचा पोलीस प्रयत्न करतायत का? असे प्रश्न या प्रकरणातून उपस्थित होत असून याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे.