Coronavirus Effect | नाशिकच्या विपश्यना केंद्रातील शिबीरं अनिश्चित काळासाठी रद्द
नाशिकच्या विपश्यना केंद्रातील उद्यापासूनचे सर्व शिबीर अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या पुढील सूचना येत नाही कोरोनाचे सावट दूर होत नाहीत, तोपर्यंत विपश्यना केंद्रातील शिबीरं बंद राहणार आहेत.
नाशिक : कोरोना व्हायरसने आता महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. पुण्यात काल कोरोना बाधित दोन रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसचा फटका इगतपुरीतील जागतिक दर्जाच्या विपश्यना केंद्राला देखील बसला आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार उद्यापासूनचे सर्व शिबिर अनिश्चित काळसाठी रद्द करण्यात आले आहेत. तर विदेशी पर्यटकांना डिसेंबर अखेर पर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. अचानक आलेली आपत्ती टाळण्यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. नागरिकांनी एकत्र येऊ नये, गर्दीचे कार्यक्रम रद्द करावेत अशा सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. इगतपुरीतील विपश्यना केंद्रात जगभरातून साधक येत असतात. त्यांच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा जिल्ह्यात शिरकाव होण्याची भीती असल्याने विपश्यना केंद्राचे कोर्सेस पुढे ढकलण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
त्यानुसार उद्यापासूनचे सर्व शिबीर अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या पुढील सूचना येत नाही कोरोनाचे सावट दूर होत नाहीत, तोपर्यंत विपश्यना केंद्रातील शिबीरं बंद राहणार आहेत. विदेशी पर्यटकांना 2020 या संपूर्ण वर्षभर प्रवेश नाकारण्यात आला आहे. 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 45 दिवस आणि 60 दिवसांचे शिबीर याठिकाणी भरवले जातात.
एकावेळी हजार ते दोन हजार साधक शिबिरात सहभागी होऊ शकतात. 11 मार्च रोजी 10 दिवसांचे शिबीर सुरू होणार होते, त्यासाठी 600 साधक धम्मगिरी पर्वतावर येणार होते. 15 मार्चपासून 30 दिवस आणि 45 दिवसांचे शिबीर होते. त्यासाठी साधारणत: 100 साधक दाखल होणार होते. तर 25 मार्चपासून पुन्हा 10 दिवसाचं शिबीर सुरू होणार होतं त्यासाठी 600 साधकांचं बुकिंगही झालं होतं. मात्र आता या सर्वांना शिबिरात येवू नका, असं सांगण्यात आलं आहे, अशी माहिती विपश्यना केंद्रप्रमुख प्रेमजी सावला यांनी दिली आहे.
कोरोनाच्या धास्तीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा शुक्रवारचा नाशिक दौराही रद्द करण्यात आला आहे. राजकीय पक्ष सामाजिक संस्थानी पुढील काही दिवस कार्यक्रम साजरे करु नये, रंगपंचमी साधेपणाने साजरी करावी, असं आवाहानही सरकारच्या वतीने करण्यात आलं आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला.
संबंधित बातम्या :
Coronvirus | राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात
Coronavirus |देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, संख्या 43 वर