(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशकात विवाहसोहळ्याला 'लव्ह जिहाद'चा रंग; जातपंचायतीच्या दबावामुळे लग्न रद्द झाल्याचा अंनिसचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी
नाशकातील विवाहसोहळ्याला लव्ह जिहादचा रंग देण्यात आला आहे. तसेच लग्नही रद्द करण्यात आलं. अशातच जातपंचायतीच्या दबावामुळे लग्न रद्द झाल्याचा आरोप अंनिसच्या वतीनं करण्यात आला आहे.
नाशिक : हिंदू आणि मुस्लिम समाजात होणाऱ्या एका लग्नसोहळ्याची पत्रिका सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे. नाशिकमध्ये पार पडणारा हा सोहळा खरं तर सगळ्यांसाठीच एक आदर्श ठरणार होता, मात्र या संपूर्ण प्रकरणाला लव्ह जिहादचा रंग देण्यात आल्याने तसेच काही धार्मिक कट्टरवाद्यांच्या धमक्यांमुळे हे लग्नच रद्द झाले आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार जातपंचायतीच्या दबावामुळे झाल्याचा आरोप करत याबाबत गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे.
नाशिक मधील एका हिंदू कुटुंबातील तरुणीचे मुस्लिम समाजाच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले आणि या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही महिन्यांपूर्वी नोंदणी पद्धतीने या दोघांनी लग्नही केले होते. विशेष म्हणजे संबंधित तरुणी ही दिव्यांग असतानाही मुलाने कुठल्याही अटीशिवाय स्व-ईच्छेने हे लग्न करण्याची तयारी दर्शवल्याने वधू कुटुंबिय देखील खूश होते. नोंदणी पद्धतीने विवाह तर झाला मात्र मुलीचे वडील एक नामांकित सराफ व्यावसायिक असल्याने हा सोहळा नातेवाईकांच्या उपस्थितीत थाटामाटात करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार दोन्ही धर्माच्या कुटुंबातील सदस्यांची लग्नाबाबत झालेली बैठक यशस्वी होताच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन हा सोहळा मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत 18 जुलै 2021 रोजी शहरातील तिडके कॉलनी परिसरातील एका हॉटेलमध्ये करण्याचे ठरले.
मुलीच्या वडिलांच्या ईच्छेनुसार, हे लग्न हिंदू रितीरिवाजाप्रमाणे करण्याचं ठरलं होत. तारीखही ठरताच घरात कामाची लगबग सुरु झाली होती, लग्नपत्रिका वाटपाचंही काम सुरु झालं मात्र मोजक्या मंडळींना डोळ्यासमोर ठेवून बनवलेली पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि मुला-मुलींच्या कुटुंबियांच्या आनंदावरच विरजण पाडलं.
ही लग्नपत्रिका काही कट्टरवादी धार्मिक संघटनांच्या डोळ्यात खुपली आणि त्यांनी हे लग्न म्हणजे लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा ठपका ठेवला. लव्ह जिहादच्या नावाने ही पत्रिका व्हॉट्स अॅप तसेच फेसबुकच्या माध्यमातून तुफान व्हायरल झाली. व्हॉट्सअॅपवर संबंधित पत्रिका आणि लव्ह जिहादचा मेसेज येताच अनेकांनी ते तसेच्या तसे पुढे फॉरवर्ड केले. मात्र यामुळे वधूकडील मंडळींना प्रचंड मनस्ताप झाला. विशेष म्हणजे त्यांच्या संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार समाजाच्या वतीने वारंवार येणारे फोन कॉल्स, धार्मिक संघटनांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या या सर्व त्रासामुळे तरुणीचे कुटुंब हैराण झाले. या संपूर्ण प्रकाराबाबत संबंधित कुटुंबातील सदस्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला असता त्यांच्या समाजाच्या अध्यक्षांची आम्ही बाजू ऐकून घेतली.
"आम्हालाही हा प्रकार समजल्यानंतर मी अध्यक्ष या नात्याने मुलीच्या वडिलांना फोन केला आणि विचारणा केली असता, हा प्रकार खरा असल्याचं त्यांनी सांगितलं. इतर धर्मात लग्न करत असल्याने चांगल्या वाईट गोष्टींचा वडिलांनी अभ्यास केला आणि त्यांनीच हे लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला तसेच समाजाच्या माहितीसाठी त्यांनी मला अध्यक्ष या नात्याने एक पत्र लिहिले की, लग्न रद्द केले आहे. यातून दोन उद्देश समोर येतायत की, माझ्या मुलीचे लग्न रद्द झाले आहे हे समाजाला सांगणे आणि दुसरे म्हणजे हा जो प्रकार त्यांनी केला आहे जो आता रद्द केल्याचं कळावं जेणेकरून त्यावर आता सोशल मीडियात चर्चा होणार नाही, आपण ते पत्र स्वीकारले आहे. मुलीचे रजिस्टर मॅरेज झालेले नाही आणि वडिलांनी देखील मला सांगितले नाही. लव्ह जिहादचा यात काही प्रकार वाटत नाही, दोन्ही कुटुंबानी घेतलेला हा निर्णय. आमच्या संघटनेवर किंवा त्यांच्या कुटुंबावर कोणीही दबाव टाकलेला नाही, आम्ही कोणी त्यांना भेटलेलो नाही. लग्न ठरवणे आणि मोडणे हे दोनही त्यांच्या स्वतःचा निर्णय आहे.", अशी प्रतिक्रिया समाजाच्या अध्यक्षांनी दिली.
या संपूर्ण प्रकरणाबात पोलिसांकडे अद्याप तक्रार दाखल करण्यात आली नसली तरी मात्र दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणाला लव्ह जिहादचे नाव कोणी दिले? हे लग्न रद्द करण्यामागे मुलीच्या घरच्यांवर खरंच कोणाचा दबाव तर नव्हता ना? असे अनेक प्रश्न यातून उपस्थित होत असतांनाच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्थेच्या म्हणजेच, तरुणी ज्या समाजाशी संबंधित आहे. त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागलीय. या संस्थेने जात पंचायत म्हणून भूमिका पार पाडत आणि दबाव टाकत मुलीच्या वडीलांकडून विवाह रद्द करत असल्याचं लिहून घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
एकंदरीतच काय तर हिंदू-मुस्लिम एकजुटीचं एक उत्तम उदाहरण ठरणारा हा सोहळा आता रद्द झाला. संबंधित मुलगी आणि तिचे कुटुंबीय सध्या प्रचंड तणावात आहेत, मुलीच्या वडिलांवर तर काय वेळ आली असेल याची कल्पनाच करवत नसून सायबर गुन्हे रोखण्यात आणि सोशल मिडीयावर नियंत्रण मिळवण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरत असल्याने असे प्रकार सर्रासपणे होत असल्याचं दिसून येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
व्हायरल लग्नपत्रिकेला सोशल मीडियात 'लव्ह जिहाद'चा रंग; लग्नच रद्द केल्याची दुर्दैवी घटना