खबरदार! विनापरवानगी ड्रोन उडवाल तर....नाशिकमधील 16 संवेदनशील ठिकाणे 'नो ड्रोन फ्लाय झोन'
नाशिक शहरात ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे. ड्रोन कॅमेरा उडवण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. नाशिक पोलिसांनी सुरक्षिततेसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Drone Ban In Nashik : रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम जगभरात दिसून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्या त्या देशाचे प्रमुख आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी एक ना अनेक उपाययोजना करत आहेत. यासाठी स्थानिक पातळीपासून ते देश स्तरावर सुरक्षितता जपली जात आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आता ड्रोन उडवण्यावर बंदी घातली आहे, नाशिक पोलिसांनी सुरक्षिततेसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अनेकदा दहशतवादी किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीकडून ड्रोनद्वारे नुकसान केले जाते. किंवा देशातील महत्वाच्या ठिकाणाची ड्रोनद्वारे रेकी केली जाऊ शकते. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने नाशिक शहरात ड्रोनवर बंदी घालण्यात आली आहे. ड्रोन कॅमेरा उडवण्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी पोलीस आयुक्तालय हद्दीतील 16 संवेदनशील ठिकाणे 'नो ड्रोन फ्लाय झोन' म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
नाशिक पोलिसांनी शहराच्या आणि राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकदा मोठ्या मोठ्या कार्यक्रमात ड्रोनचा वापर केला जातो. मात्र काही वेळा याच माध्यमातून दहशतवादी कारवाया होण्याची शक्यता बळावते. म्हणून ड्रोन वापरण्यासाठी आधी नाशिक पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे आदेश आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या सहीनिशी प्रसिद्धी केले आहे.
काय आहे आदेश?
नाशिकमधील महत्त्वाची धार्मिक स्थळे, प्रेक्षणीय स्थळे, लष्करी आस्थापने, प्रतिबंधित क्षेत्र 'नो ड्रोन फ्लाय झोन' घोषित करण्यात आले आहेत. शहरातील निश्चित केलेल्या ठिकाणी विनापरवानगी ड्रोन कॅमेरा वापरल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रतिबंधित केलेल्या ठिकाणच्या दोन किमी परिसरात कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हॉट एअर बलून्स आदी हवाई साधनांवर बंदी घालण्यात आली आहे.
'ही' ठिकाणे 'नो ड्रोन फ्लाय झोन'
नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीत स्कूल ऑफ आर्टिलरी, इंडिया प्रेस, करन्सी नोट प्रेस, एकलहरा थर्मल पॉवर स्टेशन, शासकीय मुद्रणालय, श्री काळाराम मंदिर, एअर फोर्स स्टेशन, आर्मी स्कूल, मध्यवर्ती कारागृह, पोलीस प्रशिक्षण केंद्र यासह महत्त्वाच्या संस्था आहेत.
अशी घ्या परवानगी
तुम्हाला नाशिक शहरात ड्रोन उडवायचा असेल तर आधी परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. यासाठी अर्जाची पूर्ततेसह कार्यक्रम ठिकाण माहिती, ड्रोनची सविस्तर माहिती, ड्रोन चालकाची माहिती, ड्रोन चालकाचा परवाना आदी कागदपत्रे जमा करावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
