धरण उशाशी आणि कोरड घशाशी; धरणाशेजारच्या गावात पाणीटंचाई, पाण्यासाठी करावी लागते पायपीट
Water Problem Near Dam Nahsik : एकीकडे महाराष्ट्रात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने धरणं तुडुंब भरली असून नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
Water Problem Near Dam Nahsik : एकीकडे महाराष्ट्रात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने धरणं तुडुंब भरली असून नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. मात्र दुसरीकडे नाशिक तालुक्यातील कश्यपी धरणासमोरच एक विरोधाभासी चित्र बघायला मिळत आहे. धरणाशेजारी असलेल्या गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी झऱ्याच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
धरण उशाशी आणि कोरड घशाशी अशी ईथली परिस्थिती आहे. नाशिक तालुक्यातील कश्यपी धरणाला लागूनच खाड्याची वाडी हे गाव आहे. जे कश्यप नगर म्हणूनही ओळखले जाते. मात्र याच गावातील नागरिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. धरणासमोरच असलेल्या एका टेकडीवरून झऱ्याचे पाणी वाहत येते, ते पाणी भरण्यासाठी अगदी पहाटेपासूनच जवळपास एक किलोमीटर अंतर पायपीट करत या नागरिक येथे पोहोचतात. त्यानंतर झाडांच्या पानाने पाण्याला वाट करत झऱ्यातील पाण्याने वाटी वाटी हंडा भरला जातो. त्यानंतर डोक्यावर आणि कंबरेवर हंडा घेत चिखलमय झालेल्या वाटेतून जीव मुठीत घेऊन खाली उतरतात. यासोबतच काही महिलांना धरणाच्या मागील बाजूला असलेल्या झऱ्यातून पाणी भरण्यासाठी झाडा झुडपातून खडतर वाट काढत जावे लागते.
येथे एवढे मोठे धरण असूनपण आम्हाला पाणी नाही भेटत, अशी संतप्त प्रतिक्रिया या गावातील नागरिकांनी दिली आहे. आम्हाला पाण्याची सोय करायला पाहिजे. पावसाळा लागल्या पासून आमचे हे हाल आहेत. (नाहीतर लांब विहिरीवर जावे लागते), अशी प्रतिक्रिया काही गावकऱ्यांनी दिली आहे. आमच्या गावात पाणी का येत नाही, हे ग्रामपंचायत वाल्यांनाच माहिती आहे. ते गावात येऊन ते मिटिंग घेतात. त्यानंतर काही दिवस पाणी येते, नंतर परत येत नाही, असे एका गावकऱ्यांनी सांगितलं. येथे येऊन टीप टीप पाणी भरतो, घरचे सगळे काम सोडून द्यावे लागते. पाण्यासाठी इकडे येऊन बसावे लागते. पहाटे पाच साडेपाच पासून येथे महिला पाणी भरायला येतात. डोक्यावर हंडा घेऊन डोंगरावरील चिखलातून खाली उतरतो. याची भीती वाटते, पण काय करणार? अनेकदा पाय घसरुन महिला पडल्या पण आहेत. गावात पाणी यायला पाहिजे, एवढी एकच आमची आपेक्षा आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.
आणखी वाचा :
Dhule Crime : गुजरातच्या शकुल कंपनीकडून महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची फसवणूक, 76 कोटी रुपयांचा गंडा