Sudhakar Badgujar : संजय राऊतांची आगपाखड, नितेश राणेही कडाडले, बडगुजर प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटणार
मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी केल्याप्रकरणी नाशिकचे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
Sudhakar Badgujar नाशिक :मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत (Salim Kutta) पार्टी केल्याप्रकरणी शिवसेना उबाठा गटाचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बडगुजर यांच्या विरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर गुन्हा दाखल झाल्याने याचे राजकीय पडसाद आगामी काळात उमटणार आहेत.
दहशतवादी सलीम कुत्ता सोबत मै हू डॉन गाण्यावर नाच करतानाचा सुधाकर बडगुजर यांचा व्हिडिओ आणि फोटो भाजप आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केल्याने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) तत्काळ कारवाई करत सुधाकर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यानंतर नाशिकच्या क्राईम ब्रांचने बडगुजर यांची साह ते सात वेळा चौकशी केली. चौकशीअंती बडगुजर यांच्या विरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बडगुजरांविरोधात कारवाईचा फास
मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी असणाऱ्या सलीम कुत्तासोबत पार्टी करणे, त्याला भेटवस्तू दिल्याप्रकरणी बडगुजर यांच्या विरोधात कारवाईचा फास आवळण्यात आलाय. सलीम कुत्ताला भेट का दिली? पार्टीच्या आधी आणि नंतर कितीवेळा बडगुजर यांचा सबंध सलीम कुत्तासोबत आला होता. या बाबत चौकशी करण्यात आली आहे. तीच चौकशी पुढे आणखी खोलवर केली जाणार आहे.
बडगुजरांच्या नातेवाईकाच्या फार्म हाऊसवर पार्टी
आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुधाकर बडगुजर यांच्या नातेवाईकाच्या फार्महाऊसवर २४ मे 2016 रोजी सलीम कुतासाठी पार्टी आयोजित करण्यात आली होती. पॅरोलवर सुटलेला सलीम कुत्ता पुन्हा नाशिकच्या कारागृहात हजर होण्याआधी याच फार्महाऊसवर आला होता. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात आली, अशी माहिती आडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी दिली आहे.
राजकीय सूडबुद्धीने कारवाई, बडगुजरांचा आरोप
माझ्यावरची कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी केला आहे. या पार्टीत इतर पक्षाचे लोक होते त्याच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित केला आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांचा एका महिलेसोबतच व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला. त्या विषयी देखील पोलिसांनी कारवाई केली नाही. पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करत असून असून सत्ताधाऱ्यांना एक न्याय आणि विरोधकांना एक न्याय दिला जात असल्याचा आरोप बडगुजर यांनी केलाय.
राजकारणात पडसाद उमटणार
दरम्यान, बडगुजर यांच्यावर झालेल्या कारवाईचे राज्याच्या राजकारणात पडसाद उमटायला सुरुवात झालीय. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर आगपाखड केली आहे. तर सुधाकर बडगुजर यांचा गॉडफादर संजय राऊत असल्याने त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे.
ठाकरे गटाला मोठा धक्का
सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने शिवसेना उबाठा गटाला (Shiv Sena UBT) जबर धक्का बसला असून त्या पार्टीत सहभागी असणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांवर कारवाई का केली नाही, असा सवाल वरिष्ठ नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सलीम कुत्ता पार्टी प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडणार असून भाजपच्या आरोपांना शिवसेना कसे उत्तर देणार? पोलिसांनी केलेल्या कारवाईची व्याप्ती किती वाढणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा