Advay Hiray : अद्वय हिरेंचा कोठडीतील मुक्काम वाढला, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
Advay Hiray : रेणुका सुत गिरणी कर्ज व जिल्हा बँक आर्थिक फसवणूक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामीन अर्ज मालेगाव अपर सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
Malegaon News मालेगाव : रेणुका सुत गिरणी कर्ज व जिल्हा बँक आर्थिक फसवणूक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hiray) यांचा जामीन अर्ज मालेगाव अपर सत्र न्यायालयाने (Malegaon Court) आज फेटाळला आहे. काल दिवसभर हिरे यांच्या जामीनावर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत जामीन राखीव ठेवला होता.
आज न्यायालयाने निकाल देताना हिरे यांचा जामीन फेटाळल्याने हिरे यांचा न्यायालयीन कारागृहातील मुक्काम आणखी काही दिवस वाढला आहे. रेणुका यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्थेसाठी कर्ज घेण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करून जिल्हा बँकेची 7 कोटी 46 लाख रुपयांचे कर्ज घेऊन परतफेड न करता फसवणूक केल्याचा ठपका अद्वय हिरे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
अद्वय हिरेंना दिलासा नाहीच
याबाबत जिल्हा बँक वकील ॲड. वासिफ शेख (Adv. Wasif Shaikh) प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, सुरुवातीला अद्वय हिरेंनी अटकपूर्व जामीन दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर अद्वय हिरेंनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर त्यांना भोपाळवरून अटक करण्यात आली होती. काल दिवसभर हिरे यांच्या जामीनावर सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेत निर्णय राखीव ठेवला होता. आज कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
तीन टप्प्यात घेतले सात कोटींचे कर्ज
सन 2013 मध्ये रेणुकादेवी सहकारी सुतगिरणीसाठी जिल्हा बँकेतर्फे कर्ज घेतले. त्यावेळी अद्वय हिरे हे बँकेचे अध्यक्ष होते. पहिल्या टप्प्यातील 2 कोटी 80 लाख रुपये कर्ज घेण्यासाठी तारण दिलेली मालमत्ता अवघी 1 कोटी 51 लाखाची होती. या तारण मालमत्तेवर तीन टप्प्यात एकूण 7 कोटी 46 लाख रुपये कर्ज देण्यात आले आहे. थकबाकी व्याजासह रक्कम थकीत आहे. याउलट बँकेतील सामान्य ग्राहकांना त्यांचे गुंतवणूक केलेले पैसे मिळणे अवघड झाले आहे. कर्जापोटी घेतलेली रक्कमेतील 6 कोटी रुपये हिरे यांनी रेणुकादेवी सुतगिरणीच्या खात्यातून व्यंकटेश बँकेत वर्ग केले. या बँकेचे अध्यक्ष त्यांचे वडील होते. शिवाय यंत्रमाग युनिट सुरु झाले नाही. यामुळे जामीन अर्ज मंजूर करु नये असा युक्तिवाद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी : बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर, मोदी कचऱ्याच्या डब्यात असते; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली