मोठी बातमी : बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर, मोदी कचऱ्याच्या डब्यात असते; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
Uddhav Thackeray Dharashiv Sabha : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

Maharashtra Politics : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) नसते, तर मोदी (PM Modi) कचऱ्याच्या डब्यात असते, असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) तोफ डागली आहे. उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथील सभेत संबोधन करताना पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर, मोदीच दिसले नसते, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.
...तर, मोदी कचऱ्याच्या डब्यात असते
मोदींचे फोटो लावून जिंकल्याचा भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की, ज्यावेळी मोदी नाव कुणाला माहिती नव्हतं तेव्हाही आम्ही धाराशिव जिंकत होतो. शिवसेनाप्रमुख होते, म्हणून मोदी तुम्हाला दिसतायत, आम्हाला काय सांगताय मोदींचं कौतुक. आम्हाला आमचे कट्टर शिवसैनिक आणि जीवाला जीव देणारे कट्ट्रर मावळे पुरेसे आहेत. जेव्हा अटल बिहारी वाजपेयी मोदींना कचऱ्याच्या पेटीत टाकायला निघाले होते, तेव्हा हिंदुह्रदयसम्राट शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं नसतं तर, मोदीच दिसले नसते, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदींवर जोरदार घणाघात केला आहे. बाळासाहेबांनी जो पक्ष स्थापन केला, त्या पक्षाच्या शिवसैनिकाला जिंकण्यासाठी मोदींची गरज लागेल का, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
तुमच्या बापाचे फोटो लावून मत मागा
तुमच्या बापाचे फोटो लावून मत मागा ना, स्वतःच्या वडिलांवर विश्वास नाही का, ते काही करू शकतील म्हणून मी केवळ राजकीय बाबतीत बोलतोय. मोदींनी माझा उल्लेख मेरे छोटे भाई असं म्हटलं होतं. आता मेरा परिवार असं सुरु केलं, नशीब आता तरी सुचलं, पण तुमच्याआधी मी माझे कुटुंब, माझी जबाबदारी असं म्हटलेलं होतं. तुम्ही कधीही जबाबदारी घेतली नाही, मी अजून ही म्हणतोय माझे महाराष्ट्र माझी जबाबदारी, असं ठाकरेंनी म्हटलं आहे.
देश कुणी लुटला? हे सांगा
काँग्रेसने देश विकला असं म्हणतात मग माझा तुम्हाला सवाल आहे, निवडणूक रोख्यातून हजारो कोटी भाजपने जमावले. त्याबाबत स्टेट बँकेने निर्लज्जपणे सांगितले की, आम्हाला तपशील गोळा करायला वेळ लागेल. भाजपाला निवडणूक रोख्यातून सहा ते सात हजार कोटी आले, मात्र काँग्रेसला केवळ 700 कोटी आले. मग देशाला कोणी लुटलं हे सांगा. काँग्रेसने 60 वर्षात 7800 कोटी जमले, मात्र तुम्ही पाच वर्षात सात हजार कोटी जमवले.
गरिबाला आज काय देणार ते सांगा, ठाकरेंचा सवाल
उद्धव ठाकरे म्हणाले, देश गुजरातमधून चालवला जातोय, 2047 मध्ये देश सर्वात बलवान असेल, असं म्हणतात 2047 तुम्ही तरी बघणार आहे का? 2047 तुमच्या उरावर घाला, गरिबाला आज काय देणार सांगा. गद्दारांना पन्नास कोटी देता आणि गरिबांना काहीही नाही. अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात मांडला, हे त्यांचे सगेसोयरे, कॉन्ट्रॅकटर यांचे पोट भरण्यासाठी, कॉन्ट्रॅक्टर जोमात आणि आमचं शेतकरी कोमात असं चाललं आहे.
यांच्या दाढीचे फोटो आम्ही बघत बसायचे, ठाकरेंचा शिंदेना टोला
या मुख्यमंत्री यांनी जाहिरातीसाठी 84 कोटी रुपये खर्च केले. यांच्या दाढीचे फोटो आम्ही बघत बसायचे,असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेना टोला लगावला आहे. मी असतो तर जाहिरात ऐवजी शेतकऱ्यांना हक्काचा भाव दिला असता. आम्ही काम केलं पण त्याची जाहिरात करत बसलो नाही. मविआ सरकारने जे कर्जमाफी केलं ते मिळाली की नाही? पण मी जाहिरात केली नाही. उद्धव ठाकरे सरकार नाही जनता जनार्दन सरकार आहे, यांच्या डोक्यात मात्र मस्ती घुसली आहे.
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर निशाणा
देशाचे गृहमंत्री मणिपूर पेटलं तिकडे जायची हिंमत नाही आणि महाराष्ट्रात फणा काढत आहेत, हा नागोबा काश्मिरमध्ये जायचं हिंमत नाही तिकडे शेपूट, अरुणाचलमध्ये चीन घुसतोय, तिकडे शेपूट. अशा शेपूट घाल्या मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावर फणा काढतोय. तिकडे यांची जायची हिंमत होत नाही. शिवसेना भाजपाला गाडून मूठमाती देऊन पुढे जाईल, असं ठाकरे म्हणाल आहेत.
उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
अमित शाह यांचा नवा शोध महाविकास आघाडी पंक्चर झालेली रिक्षा आहे, पण यांच्या ट्रिपल इंजिन सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लागली आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हणत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भ्रष्टाचार तितुका मेळवावा, भाजप पक्ष वाढवावा, असं मोदींचं चाललं आहे.
पाहा व्हिडीओ : उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
महत्त्वाच्या इतर बातम्या :























