Chhagan Bhujbal : नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या नियोजनात छगन भुजबळ अलिप्त? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
Nashik news : राष्ट्रीय युवा महोत्सव आणि पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचे जोरदार नियोजन सुरु आहे. भाजप आणि शिवसेना यात आघाडीवर आहे. तर छगन भुजबळ आणि अजित पवार गट अनुपस्थित असल्याच्या चर्चा सुरु आहे.
Chhagan Bhujbal नाशिक : राष्ट्रीय युवा महोत्सवाला (National Youth Festival) शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) महोत्सवाचे उद्घाटन करणार असून त्यांचा भव्य रोड शो देखील आयोजित करण्यात आला आहे. आयोजना साठी नाशिकमध्ये (Nashik News) अनेक राजकीय नेते दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दोन-तीन दौरे केले आहेत. मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय बनसोडे, मंत्री दादा भुसे हे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. मोदींचा दौरा आणि राष्ट्रीय युवा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे.
भाजप आणि शिवसेना तयारीत आघाडीवर आहे. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाने मात्र तयारीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. नाशिकचे मंत्री छगन भुजबळांसह (Chhagan Bhujbal) पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्यक्रमापासून अलिप्त असल्याचे दिसून येते. छगन भुजबळ हे गुरुवारी नाशिकमध्ये होते. तयारीच्या अखेरच्या दिवशी ते नियोजन प्रक्रियेत सहभागी होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
अजित पवार गटाचे नेते अनुपस्थित
शिवसेनेचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) वगळता अजित पवार गटाचे मंत्री, आमदार व अन्य पदाधिकारी अनुपस्थित होते. या बैठकीचे निमंत्रण आम्हाला दिले गेले नव्हते, असे अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार
महोत्सवात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) स्वत: उपस्थित राहणार आहेत. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याशी आपण संपर्कात आहोत. महायुतीतीतील तिन्ही प्रमुख पक्ष आणि अन्य मित्रपक्षांच्या समन्वयाने पंतप्रधानांची सभा ऐतिहासिक केली जाणार असल्याचा दावा भाजपचे नेते तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे.
राजकीय वर्तुळात ठरतोय चर्चेचा विषय
एकीकडे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह भाजप नेते गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये येत दौऱ्याचा आढावा घेतला आहे. तर दुसरीकडे छगन भुजबळांची (Chhagan Bhujbal) अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या