Jayant Patil : माकपचा शरद पवारांना गंभीर इशारा, जयंत पाटील तडकाफडकी नाशिकमध्ये दाखल; म्हणाले...
Dindori Loksabha : माकपचे माजी आमदार जे पी गावीत यांनी शरद पवार गटाचा दिंडोरीतील उमेदवार पडणारच असा इशारा दिला. त्यानंतर आज जयंत पाटील हे तातडीने नाशिक दौऱ्यावर आले आहेत.
नाशिक : दिंडोरी लोकसभेसाठी (Dindori Lok Sabha Constituency) सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून माकपचे माजी आमदार जे पी गावीत (J P Gavit) यांनी काल जाहीर सभा घेत बंडाचा इशारा दिला होता. तसेच शरद पवार गटाचा इथला उमेदवार पडणारच असल्याचं सांगत थेट शरद पवारांवरच (Sharad Pawar) त्यांनी निशाणा साधला होता.
आज दुसऱ्याच दिवशी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) अचानक नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा बंद दाराआड आढावा घेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून बंडखोरी होणार नाही अशी आम्हाला खात्री दिल्याचं म्हटले आहे. तसेच निवडणुकीच्या नियोजनासाठी मी आल्याचं म्हणत वादावर पडदा टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
दिंडोरी लोकसभेच्या नियोजनासाठी बोलावली बैठक
जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) हे उमेदवार दिंडोरी लोकसभेत उभे आहेत. नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांना बोलावलं. निवडणुकीसाठी एक महिन्याचा कालावधी असल्याने नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
माकपने खात्री दिलीये बंडखोरी होणार नाही
जे पी गावित यांनी दिंडोरीची जागा माकपला द्या, अन्यथा शरद पवार गटाचा उमेदवार पडणारच, असा इशारा दिला. यावर जयंत पाटील म्हणाले की, माझी आज जे पी गावित यांच्याशी चर्चा झाली नाही. परंतु, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आम्हाला खात्री दिली बंडखोरी होणार नाही. शरद पवार यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा राहील. मला खात्री आहे की, त्यांना समजून सांगितलं जाईल ते निष्ठावंत आहेत. कम्युनिस्ट पक्षाच्या विचारावर काम करणारे ते नेते आहेत. त्यांची निष्ठा कुठे ढळेल असं वाटत नाही. त्यांना आज बैठकीला बोलावलं नाही. जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली. आम्ही इथे आमचा उमेदवार उभा केला. आमच्या मित्र पक्षांचा याला पाठिंबा आहे. दिल्लीपासून नाशिकपर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांशी शरद पवार साहेब बोलले आहेत. कोणी उभा राहणार असेल तर त्याला समजावून सांगतील. सगळ्यांचे लक्ष दिंडोरीला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
...म्हणून महायुतीत उमेदवार ठरवण्यास विलंब
महायुतीच्या जागावाटपाबाबत (Mahayuti Seat Sharing) जयंत पाटील म्हणाले की, महायुतीत विसंवाद आहे. दुसऱ्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार नाही. आपल्या पक्षाचाच उमेदवार उभा करा, अशी त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे उमेदवार ठरवण्यास त्यांचा विलंब होत आहे. उमेदवारांच्या बाबतीत एवढा गोंधळ असेल तर लोकसभेत कसं लोकप्रतिनिधित्व करतील अशी शंका लोकांच्या मनात येईल, असे ते म्हणाले.
भुजबळ आमच्या पक्षात असताना ते आमचे नेते होते
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेतून जाहीर माघार घेतली. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, मला माहित नाही त्यांच्या पक्षात काय चालू आहे. आमच्या पक्षात असताना ते आमचे नेते होते. तिकडे गेल्यावर त्यांच्या काय परिस्थिती आहे मला कसे कळणार? असे त्यांनी यावेळी म्हटले.
आणखी वाचा