ACB: एसीबीचा महावितरणला शॉक, अतिरिक्त कार्यकारी अभियंता लाच घेताना ताब्यात
Mahavitaran: महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय घालपे हा 17 हजारांची लाच घेताना सापडला आहे.

नाशिक: शहरासह जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांना लगाम लागल्याचे दिसत असताना आता पुन्हा एकदा लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. लाचलुचपत विभागाने आज केलेल्या कारवाईत वीज वितरणचा क्लास वन अधिकारी जाळ्यात सापडला आहे.
गेल्या काही महिन्यात नाशिक शहरासह जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांनी उत आणला होता. तर काही दिवसांपासून हे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र पुन्हा एकदा एसीबीने धडक कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. आता नाशिक शहराला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता लाच घेताना रंगेहाथ सापडला आहे.
नाशिक एसीबी पथकाने महावितरणच्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय मारुती घालपे याला ताब्यात घेतलं आहे. घालपे हा क्लास वन अधिकारी असून तब्बल 17 हजार रुपयांची लाच घेताना तो एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
नाशिक एसीबी दिलेल्या माहितीनुसार एका बिल्डिंगच्या साईटवर ट्रांसफार्मर बसवणे, तसेच प्रत्येक इलेक्ट्रिक मीटरचे कनेक्शन देणे असे काम होते. या कामासाठी घालपे याने वीस हजार रुपयांची मागणी केली. बिल्डिंग साइटवर 41 वीज मीटर ट्रांसफार्मर बसवणे. या कामास मंजुरी देण्याचे अधिकार घालपेकडे होते. त्या बदल्यात त्यांनी ही लाच मागितल्याचे समोर आले आहे. पाचशे रुपये प्रति मीटर प्रमाणे 41 मीटरचे वीस हजार पाचशे रुपये द्यावे, अशी मागणी त्याने केली तडजोडीअंती ही रक्कम 17 करण्यात रुपये करण्यात आली.
यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार एसीबीने तात्काळ सापळा रचत संजय घालपे यास लाच घेताना रंगेहाथ पकडले. संजय घालपे हा महावितरणच्या द्वारका परिसरातील उपविभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता आहे. आता महावितरणचा क्लास वन अधिकारीच एसीबीच्या जाळ्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
