Nashik-Mumbai Highway : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, रंगाचे ड्रम रस्त्यावर पडल्याने मोठी वाहतूक कोंडी
Nashik Accident News : नाशिक - मुंबई महामार्गावर अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता याच महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Nashik Accident News : नाशिक - मुंबई महामार्गावर (Nashik Mumbai Highway) अपघातांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता याच महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघात झाल्यानंतर कंटेनर उलटला आणि त्यातील रंगाचे ड्रम रस्त्यावर पडले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक मुंबई महामार्गावर मंगळवारी दुपारी ट्रकला अपघात झाला. रंगाचे ड्रम असलेला कंटेनरला महामार्गावर अपघात झाल्याने हा कंटेनर उलटला. त्यामुळे रंगाचे ड्रम रस्त्यावर सांडले आहेत. नाशिकच्या जैन मंदिराजवळ (Jain Mandir) ही घटना घडली आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी
ट्रकमधून पेंटचे ड्रम रस्त्यावर पडल्यामुळे नाशिक - मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याचे दिसून आले. कंटेनर आडवा झाल्याने मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघात झालेल्या ठिकाणची वाहतूक सध्या एकेरी सुरु आहे. ट्रकला महामार्गावरून हटवण्याचे काम सध्या सुरु करण्यात आले आहे.
चार दिवसांपूर्वीही नाशिक-मुंबई महामार्गावर अपघात
दरम्यान, चार दिवसांपूर्वीच नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला होता. एका चारचाकीने काही तरुण भरधाव वेगाने येत होते. त्यावेळी अचानक वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे गाडी महामार्गालगत असलेल्या टेकडीवर जावून आदळली. शहापूर तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गावरील ड्रीम हॉटेल जवळ ही घटना घडली होती.
दोघांचा मृत्यू तर दोन जखमी
अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू तर दोन जण जखमी झाले होते. रवी शिवराम धापटे आणि पप्पू शिवराम भला (रा. शिरोळ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्वप्निल गावंडे व रवी बागडे हे गंभीर जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
नाशिक शहरात अपघातांच्या तीन घटना
शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातांमध्ये दोन महिला व एक पुरुष जागीच ठार झाल्याची नोंद विविध पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे. अपघाताचा पहिला प्रकार अमृतधाम चौफुली येथे घडला. राजाराम भगीरथ सिंग याने त्याच्या ताब्यातील टँकर भरधाव चालवून स्कुटीवरुन जाणाऱ्या अश्विनी पंडित शेजवळ (23, रा. इरिगेशन कॉलनी, मखमलाबाद) या तरुणीला धडक दिली. त्यात ही तरुणी खाली पडून जागीच ठार झाली.
अपघाताचा दुसरा प्रकार दिंडोरी रोड येथे घडला. ज्योती शंकर वाघ (45, रा. मायको दवाखान्यामागे, कालिकानगर, पंचवटी) ही महिला दिंडोरी रोडवरील तारवाला सिग्नलकडे पायी जात होती. त्यावेळी तिला भरधार अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत या महिलेचा मृत्यू झाला. अपघाताचा तिसरा प्रकार विहितगाव रोड येथे घडला. नासिर दादामियाँ पानसरे (रा. खडकाळी, भद्रकाली) याने त्याच्या ताब्यातील आयशर ट्रक भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या मोटारसायकलला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार आकाश गोकुश साटोटे (27, रा. वडनेर दुमाला, नाशिक) याचा मृत्यू झाला.
आणखी वाचा