Chhagan Bhujbal : 'भुजबळ किती जणांना पाडेल याचा विचार करा, उगाच दादागिरी करु नका'; भुजबळ पुन्हा कडाडले
Chhagan Bhujbal : जालन्यामध्ये महाएल्गार सभेत मंत्री छगन भुजबळांनी जरांगे पाटलांवर टिकास्त्र सोडलं. पुन्हा एकदा भुजबळांनी आरक्षणासाठीची त्यांची भूमिका स्पष्ट केलीये.
नाशिक : भुजबळांना पाडा असं म्हणतात, भुजबळ किती जणांना पाडेल याचा विचार करा त्यामुळे उगाच दादागिरी करु नका, असं म्हणत छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. जालन्यातील ओबीसींच्या महाएल्गार सभेनंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर भाष्य केलं आहे. जबरदस्तीने जर ओबीसीमधून आरक्षण दिले तर कोर्टात प्रकरणं जाणार आणि आरक्षणाचा मुद्दा अडकून पडणार. यामुळे कुणाला काहीच मिळणार नाही. शंभर कोटी लोकं असतात, असं सर्वांना आरक्षण देता येत नाही. त्यातल्या काहींना संधी मिळते, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.
दरम्यान मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं अशी आमची देखील मागणी आहे, पण ते ओबीसीमधून (O) न देण्याची आमची भूमिका आहे, असं म्हणत छगन भुजबळांनी पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीवर त्यांची भूमिका स्पष्ट केलीये. आधीच ओबीसींना तुटपुंजे आरक्षण आहे, त्यामुळे वेगवेगळं द्या. आरक्षण मिळणार नाही, असं नाही. फडणवीसांनी प्रयत्न केले पुन्हा त्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी देखील यावेळी भुजबळांनी केलीये.
उगाच दादागिरी करु नका - भुजबळांचा इशारा
दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस काय करत आहेत, असा सवाल देखील यावेळी भुजबळांकडून उपस्थित करण्यात आला. एकमेकांची डोकी फुटल्यावर पोलीस कारवाई करणार का. भुजबळांना पाडा असं म्हणतात, भुजबळ किती जणांना पाडेल याचा विचार करा. आम्हालाही गणित कळतं. 54 टक्के ओबीसी आहेत. त्यामुळे उगाच दादागिरी करु नका असा इशारा देखील यावेळी छगन भुजबळ यांनी दिलाय.
मंत्रिपदाची फिकीर नाही, भुजबळांचा संभाजीराजेंना टोला
छगन भुजबळ यांनी जालन्यातील सभेतून मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. त्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया देत त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली. यावर भुजबळांनी म्हटलं की, तुम्ही शाहू महाराजांच्या गादीवर आहात. आम्ही तुमचा सन्मान करतो. पण तुम्ही एकाच समजाविषयी कसे बोलू शकता. ज्यांची घरं जाळली त्यांच्या घरी तुम्ही जायला हवं होतं, त्यांचे अश्रू पुसायला हवे होते. मला आमदार, मंत्रिपदाची फिकिर नाही
म्हणून लाठीचार्ज झाला - भुजबळ
लोकांना लाठीचार्ज झाला हे पाहिलं पण तो का झाला हे कोणीही पाहिलं नाही. लोकांसमोर एकच बाजू मांडली गेली. पोलीस उपोषणस्थळी गेले पण त्यांनी उपोषणस्थळावरुन उठण्यास विरोध केला. त्यावेळी प्रचंड दगडांचा मारा करण्यात आला. त्यामध्ये 70 पोलीस जखमी झाले. याची चौकशी करण्यासाठी देखील कोणी गेलं नाही. महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यात आला. त्यांना त्रास देण्यात आला. महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकला म्हणून लाठिचार्ज केला, असं स्पष्टीकरण देखील यावेळी छगन भुजबळ यांनी दिलं.
काही लोकं आरक्षणासाठी हाटून बसलेत - भुजबळ
शरद पवार हे मुख्यमंत्री होते, त्यावेळी देखील त्यांना आरक्षणासाठी काम करावे लागले होते. पण काही लोकं आता आरक्षणासाठी हटून बसलेत. लोकांची घर जाळलीत, आमदारांची घरं पेटवलीत. महिला मुलं कशीबशी वाचलीत. थोर पुरुषांनी जाळपोळ करा, घर जाळा असं सांगितलं होतं का, असा सवाल भुजबळांनी यावेळी उपस्थित केला.