Nashik News : ललित पाटीलसोबत ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोटो, नाशिकमध्ये शिंदे गटाकडून मंत्री दादा भुसे यांची पाठराखण
Nashik Dada Bhuse : नाशिकमध्ये शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या नेत्यांचे ललित पाटील सोबतचे फोटो व्हायरल करण्यात आले आहे.
नाशिक : ललित पाटील (lalit Patil) आणि नाशिक येथील त्याचा भाऊ भूषण पाटील (Bhushan Patil) यांच्या कारखाना प्रकरणावरून चांगलाच वाद रंगला असून आता शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे असा वाद रंगला आहे. तर ललित पाटीलशी संबंधित ठाकरे गटाच्या नेत्यांचे फोटो व्हायरल होत असून यामुळे आता दोन्ही गटामध्ये राजकीय युद्ध सुरू असल्याचे चित्र असून एकप्रकारे दादा भुसे (Dada Bhuse) यांची पाठराखण शिंदे गटाकडून केली जात आहे.
नाशिकच्या (Nashik) शिंदे गावात ललित पाटील चा भाऊ भूषण पाटील याचा ड्रग्जचा कारखाना (Drug factory) उध्वस्त करण्यात आला. पोलिसांना ड्रग्जचा मोठा साठा या ठिकाणी आढळून आला. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. मात्र यानंतर हे प्रकरण सुरू असताना अचानक दादा भुसे यांनी संशयितांना अभय देत आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केल्यानंतर वाद चिघळला आहे. त्यानंतर आता शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांचा ललित पाटीलसोबतचा फोटो व्हायरल करण्यात आला. या फोटोमध्ये उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या हस्ते ललित पाटील शिवबंधन बांधताना दिसून येत असून शेजारी मंत्री दादा भुसे, माजी महापौर विनायक पांडे उभे असल्याचे दिसत आहे. हा वाद सुरू असताना दुसरीकडे शिंदे गटाकडून ठाकरे गटातील नेत्यांचे ललित पाटील सोबतचे फोटो व्हायरल करण्यात येत आहेत. त्यामुळे नाशिक ड्रग प्रकरणावरून राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
दरम्यान नाशिकच्या काही मंत्र्यांची ललित पाटीलला साथ होती, असा आरोप नेत्यांकडून करण्यात येत असल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. सुषमा अंधारे यांनी यांनी दादा भुसेमुळेच ललित पाटील पळून जाण्यात यशस्वी झाल्याचा आरोप केला आहे तर अंधारेंनी आपला आरोप सिद्ध करावा अन्यथा मालेगाव शहरवासीयांची माफी मागावी, असे भुसे यांनी प्रति आव्हान दिले आहे. दरम्यान आता शिंदे गटाकडून ठाकरे गटाचे बबनराव घोलप, विनायक पांडे आदींचे फोटो समोर आले आहेत. तेव्हा शिवसेना ठाकरे गटात असलेले आता शिंदे गटात असलेले हेमंत गोडसे यांच्यासोबतचे फोटो समोर आले आहे. तर शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे म्हणाले कि, ललित पाटील यांच्यासोबत ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी दिसून येत आहेत. त्यामुळे ललित पाटील व भूषण पाटीलची रीतसर चौकशी होणं आवश्यक आहे. अंधारे यांनी हे फोटो बघून बघावे, परीक्षण करावे, त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करण्याचा आपला कुठला अधिकार नाही. ठाकरे गटाचे जे कोणी पदाधिकारी आहेत. त्यांचीही चौकशी होणं आवश्यक असल्याचे ते म्हणाले आहेत.
ठाकरे गटाच्या नेत्यांचे उत्तर
यावर बबनराव घोलप म्हणाले की, ललिता शिवसेनेचा कार्यकर्ता होता. माझ्याकडे तो एक दोनदा आला असेल, परंतु तोपर्यंत त्याची कुठलीही पार्श्वभूमी आम्हाला कुणालाच माहीत नव्हती. त्यामुळे आमचा कुठलाही त्याच्याशी याव्यतिरिक्त संबंध नव्हता, अशी प्रतिक्रिया घोलप यांनी दिली आहे. तर विनायक पांडे म्हणाले की ललित पाटील हा मूळचा आरपीआयचा कार्यकर्ता होता नंतर तो शिवसेनेत आला शिवसेनेत आल्यावर या पक्षाच्या नेत्यांच्या तो जवळजवळ पाहत होता याच काळात पहिल्यांदा माझा त्याची संपर्क आला पण त्यानंतर मी पूर्णतः त्याच्याशी संबंध तोडले असल्याचे देखील विनायक पांडे यांनी सांगितलं.
इतर महत्वाची बातमी :