Nashik News : नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव बेमुदत बंद, कांदा व्यापाऱ्यांनी दिली बंदची हाक, बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट
Nashik Onion Issue : नाशिकमध्ये (Nashik) कांदा उत्पादक शेतकऱ्यानंतर आता कांदा व्यापारी वर्गाने बेमुदत संपाची हाक दिली आहे.
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) कांदा प्रश्न पुन्हा पेटला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यानंतर आता कांदा व्यापारी वर्गाने बेमुदत संपाची हाक दिली आहे. कांदा व्यापाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात तोडगा निघू शकला नसल्याने आजपासून कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे. यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समिती व उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहेत.
नाशिकला कांदा प्रश्न नवीन नाही. गेल्या काही महिन्यात सातत्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची (Onion Farmers) अनेक आंदोलन पहायला मिळाली. सुरवातीला केंद्र सरकारने निर्यात शुल्क (Onion Export Duty) वाढविल्यामुळे शेतकरी संतप्त झाला होता. त्यानंतर केंद्राने नाफेडकडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतरही शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. अनेक दिवस हे आंदोलन (Farmers Protest) सुरु होते. आता कुठे कांदा लिलाव सुरु होते, तोच आता कांदा व्यापा-यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत जिल्हाधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघू न शकल्यामुळे आजपासून कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले आहेत. तसेच कांद्याचे निर्यातमूल्य वाढवल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदची हाक दिली असून नाशिक (Nashik onion) जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समिती व उपबाजार समितीत कडकडीत बंद ठेवण्यात आल्या आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीस न आणल्याने बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
दरम्यान यापूर्वीच कांदा निर्यात शुल्क वाढविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळाला. अनेक दिवस आंदोलने सुरु होती. त्यातच व्यापारी वर्गाचेही नुकसान होत असल्याने नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने (Onion Traders Association) आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री व पणनमंत्र्यांना निवेदन दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठक घेण्यात आली. मात्र, व्यापारी वर्गाने निवेदनात मांडलेल्या मागण्यांवर बैठकीत तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आजपासून जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीसह 17 कृषी उत्पन्न बाजार समित्या बेमुदत बंद राहणार असून एका दिवसात साधारणतः 30 ते 40 कोटींची उलाढाल ठप्प होणार असल्याची माहिती आहे. तसेच व्यापाऱ्यांच्या मागण्या मंगळवारपर्यंत मान्य न झाल्यास नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनचे सदस्य बुधवारपासून कांदा लिलाव कामकाजात सहभागी होणार नाहीत, असा निर्णय जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने घेतला आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
दरम्यान गेल्या काही महिन्यापासून कांदा प्रश्न चांगलंच चर्चेत आला आहे. निर्यात शुल्क वाढविल्यानंतर अनेक दिवस शेतकऱ्यांनी आंदोलने केली. त्याचबरोबर बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव देखील बंद होते. तसेच बाहेर राज्यातील वाहतूक देखील बंद होती. अनेक कांद्याचे कंटेनर्स उभ्या अवस्थेत होते. त्यामुळे यापूर्वीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातच आता कुठे बाजार समित्या पूर्वपदावर आल्या असताना अचानक व्यापारी संघटनांनी बंद पुकारला आहे. एकीकडे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना पुन्हा बाजार समित्या बेमुदत बंद राहणार असल्याने कांद्यासह इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या मागण्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कुठलाही सकारात्मक तोडगा न निघाल्याने जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.
इतर महत्वाची बातमी :