Nashik Onion Issue : अखेर कांद्याचा तिढा सुटला, नाशिक जिल्ह्यात उद्यापासून कांदा लिलाव सुरु होणार; भारती पवारांची मध्यस्थी
Nashik News : केंद्रीय मंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत कांदा प्रश्नावर मध्यस्थी करत प्रश्न सोडविला आहे.
नाशिक : अखेर कांदा प्रश्नावर (Onion Issue) सकारात्मक तोडगा निघाला असून दोन दिवसांपासून ठप्प असलेले कांदा लिलाव पुन्हा एकदा सुरु होणार आहेत. उद्यापासून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव पूर्ववत होणार असल्याचे बैठकीतून समोर आलं आहे. त्यामुळे दोन दिवस कांदा बाजार पेठ ठप्प होती, अखेर उद्या म्हणजेच गुरुवार 24 ऑगस्टपासून पुन्हा एकदा कांदा खरेदीला सुरवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न (Nashik Onion Issue) चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळाले. नाशिकसह अनेक भागांत शेतकऱ्यांची रास्ता रोकोसह आंदोलनं झाली. त्यानंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिल्लीत वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन नाफेडमार्फत (NAFED) कांदा खरेदी करण्यात येईल, अशी घोषणा केली. त्यांनतर देखील अनेक भागांत आंदोलन सुरूच आहेत. इकडे नाशिक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या निर्यात शुल्क वाढीच्या धोरणामुळे दोन दिवसांपासून लिलाव ठप्प आहेत. अशातच केंद्रीय मंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत या प्रश्नावर मध्यस्थी करत प्रश्न सोडविला आहे. त्यानुसार उद्यापासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या खुल्या होणार असून कांदा लिलावाला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापारी असोसिएशनची बैठक पार पडली. या बैठकीत अखेर सकारात्मक तोडगा निघाला असून उद्या गुरुवारपासून कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत. तब्बल तीन दिवसांच्या संपानंतर आता कांद्याचे लिलाव सुरू होणार आहेत. या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चेनंतर कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही कांदा व्यापारी बाहेरगावी असल्यामुळे उद्यापासून लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरु होणार आहे. तर निफाडसह विंचूर उपबाजार आवारात आजपासून लिलाव सुरु झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
उद्यापासून कांदा लिलाव सुरु
केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढविल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव ठप्प होते. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी दोघांनाही प्रचंड नुकसान सोसावे लागले. या पार्श्वभूमीवर काल जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली, पण त्यातून तोडगा कोणताच निघालेला नाही. त्यामुळे आज केंद्रीय राज्यमंत्री आणि दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी आज एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत अखेर कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय झाला असून कांदा खरेदी बंदीची कोंडी फुटली आहे. उद्यापासून कांदा लिलावाला सुरवात होणार असून शेतकरी यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nashik Onion Auction : नाशिकमध्ये दोन दिवसांपासून कांदा लिलाव ठप्प, डॉ. भारती पवारांनी बोलावली बैठक