... तसं काही घडलं नाही, तरीही दिलगीरी व्यक्त करतो; संयोगीताराजेंच्या पोस्टवर नाशिकच्या महंत सुधीरदास यांचे स्पष्टीकरण
संयोगीताराजे यांनी पूजा केली आणि 11 हजार रुपयांची देणगीही दिली, मात्र पुजारी किंवा मंदिर प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीने चुकीचं वक्तव्य केलं नसल्याचं महंत सुधीरदास म्हणाले.
नाशिक: संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीताराजे (Sanyogeetaraje Chhatrapati) या पावणेदोन महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी काळाराम मंदिरात महामृत्युंजय, रामरक्षा म्हटलं, त्यांना कोणीही रोखलं नाही असं महंत सुधीरदास यांनी सांगितलं आहे. तरीही त्यांना त्यावेळी काही अपमानास्पद वाटलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असंही ते म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजेदरम्यान झालेल्या घटनेविषयी पोस्ट केली. यामध्ये त्यांनी वैदिक पूजेपासून आम्हाला रोखण्यात आलं, त्याचबरोबर तुम्हाला वैदिक पूजेचा अधिकार नसल्याचे सांगण्यात आले, अशा आशयाची पोस्ट केली आहे. त्यानंतर यावरून चांगलाच वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र यावर काळाराम मंदिराचे महंत सुधीरदास यांनी पत्रकार परिषद घेत मंदिर प्रशासनाची भूमिका मांडली आहे.
आज दुपारी महंत सुधीरदास यांनी काळाराम मंदिर परिसरात पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा खुलासा केला आहे. ते म्हणाले की, संयोगीताराजे यांनी आता पोस्ट केली आहे, मात्र जवळपास पावणेदोन महिने झाले, त्यावेळी त्या नाशिकला आल्या होत्या. त्यावेळी संभाजीराजे छत्रपती यांचा वाढदिवस नाशिकमध्ये साजरा करण्यात आला होता. संभाजीराजेंच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी संयोगीताराजे छत्रपती या काळाराम मंदिरात आल्या होत्या. या दिवशी त्यांनी मंदिरात काळारामाचे दर्शन घेत पूजा देखील केली. मात्र यात पुजारी किंवा मंदिर प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीने चुकीचे वक्तव्य केले नसल्याचे सुधीरदास म्हणाले.
मात्र या संदर्भात संयोगीताराजे छत्रपती यांनी मंदिर पुजाऱ्याने वैदिक पद्धतीने पूजा करण्यास नकार दिल्याचे सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. यावर महंत सुधीरदास म्हणाले की, पुराणोक्त या शब्दाला त्यांचा आक्षेप होता, मात्र आम्ही त्यांना काळाराम मंदिर परिसर दाखवत प्रसाद दिला. शिवाय त्यांनी अकरा हजार दक्षिणाही दिली. राजेंच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांनी प्रार्थना केली होती. अधिकार वगैरे मी असं कुठलंही वाक्य बोललेलो नाही, तरीदेखील आम्ही कोल्हापूरला जाऊन भेट घेऊ, असेही सुधीरदास म्हणाले.
महंत सुधीरदास पुढे म्हणाले की, "वेदोक्त पूजन व्हावे अशी संयोगीताराजे यांची इच्छा होती. त्यावेळी श्रुर्ती स्मृती पुराणोक्त असं मी म्हटलो होतो. काही वर्षांपूर्वी शाहू महाराजांबाबत जी घटना घडली, त्याच्याशी पुजारी घराण्याचा काहीही संबंध नाही. आमच्यासाठी छत्रपती घराणे हे आदरणीय असून अशा घटनांवेळी ब्राम्हण आणि पुजारी हे सॉफ्ट टार्गेट केले जाते, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. संयोगीताराजे छत्रपती यांनी मंदिरात महामृत्युंजय, रामरक्षा म्हटले. त्यावेळी जर त्यांना अपमान झाल्याचं वाटत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो."
ही बातमी वाचा: