Nashik Crime News: बंगला हडपण्यासाठी बिल्डर अजित पवाराने दिली सुपारी, वृद्ध दाम्पत्यावर घडवून आणला हल्ला
Nashik News: बंगला खरेदी करण्यासाठी अजित प्रकाश पवार नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने मजुरीचे काम करणाऱ्या एका मजुराला सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नाशिक: नाशिक (Nashik News) शहरातील कॉलेज रोड या उच्चभ्रू परिसरात मोक्याच्या जागेवर असलेला एक बंगला हडपण्यासाठी एका बांधकाम व्यावसायिकाने केलेले धाडस सध्या नाशिकमध्ये चर्चेचा विषय ठरते आहे. हा बंगला खरेदी करत त्या जागेवर आलिशान बांधकाम करण्याची इच्छा असल्याने अजित प्रकाश पवार नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने मजुरीचे काम करणाऱ्या एका मजुराला सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार बिल्डर अजित पवार याने मजुरीचे काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलासह संदीप रणबाळे आणि महादेव खंदारे यांना सुपारी दिली. तपस्वी नावाच्या बंगल्यात राहणाऱ्या वयोवृद्ध दाम्पत्याला घाबरवत त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी रात्रीच्या वेळी त्याच्यावर हल्ला करत चाकूने वार केले. घरातील दागिने, मोबाईल, मालमत्तेची कागदपत्रे आणि ईतर मुद्देमाल लुटला होता. दरम्यान याप्रकरणी गुन्हे शाखा एकच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत या गुन्हाची उकल करत बांधकाम व्यावसायिक अजित पवारांसह चौघांना अटक केली.
संशयितांकडून एक लाख 14 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी सापळा रचत चौघांना अटक केली. पोलिसांनी संशयितांच्या ताब्यातील दुचाकी, दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. चौकशी केली असता बिल्डर)अजित पवार याने दोन महिन्यापूर्वी कॉलेजरोड येथील तपस्वी बंगल्यात राहणाऱ्यांकडून घर खाली करून देण्याची सुपारी दिली . त्याप्रमाणे बंगल्यात राहणारे वयोवृध्द आजी, आजोबा यांना प्राणघातक शस्त्राने मारहाण करुन घरातील सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम , डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड , बँकेचे कागदपत्र, पारपत्र, आधारकार्ड , मतदार कार्ड वगैरे बळजबरीने काढून घेतले. पोलिसांनी संशयितांकडून एक लाख 14 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
घाबरू नका, संपर्क साधा; पोलिसांचे आवाहन
विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी हा बंगला विक्री करा असा निरोपही एका एजंटद्वारे या वृद्ध दाम्पत्याकडे पोहोचवला होता. मात्र त्यास नकार देताच पवार यांनी हे गुन्हेगारी कृत्य घडवून आणले. बिल्डर अजित पवारवर यापूर्वी एक बलात्काराचा गुन्हा देखील दाखल असून त्याने अशाप्रकारे अजून काही जागा हडपल्या आहेत ? याचा आणि इतर तपास सध्या पोलीस करतायत. असे प्रकार आणखी कुठे सुरू असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.
हे ही वाचा :
एका लग्नाची दुसरी गोष्ट! पहिल्या प्रेयसीला मंडपात ताटकळत ठेवलं, दुसऱ्या प्रेयसीसोबत नवरदेव फरार