Nashik Crime News : किरकोळ कारणावरून झालं भांडण, मद्यधुंद मित्राने केला मित्राचाच घात
Nashik News : कामटवाडे गावानजिक दोन मित्रांमध्ये शुल्लक कारणाहून भांडण झाले. भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी दुभाजकात पडलेल्या फरशीचे तुकडे डोक्यात घालून एकाची हत्या करण्यात आली.
Nashik News नाशिक : कामटवाडे (Kamatwade) गावानजिक स्व. मीनाताई ठाकरे शाळेजवळ भर रस्त्यावर दोघा मित्रांमधील शुल्लक कारणाहून झालेल्या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी दुभाजकात पडलेल्या फरशीचे तुकडे डोक्यात घालून 32 वर्षीय युवकाचा हत्या करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मयत आनंद इंगळे (Anand Ingle) (32, कामटवाडे) व संशयित आनंद आंबेकर (Anand Ambekar) (28, कामटवाडे) हे दोघे मित्र त्रिमूर्ती चौक (Trimurti Chowk) परिसरात एका हॉटेलमध्ये मद्यपान करीत असताना तेथेच त्यांच्यात झालेल्या शुल्लक कारणाच्या वादातून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर ते दोघे कामटवाडे गाव परिसरानजिक आल्यानंतर दोघांमध्ये हाणामारी सुरु झाली. यावेळी संशयित आनंद आंबेकर याने मयत आनंद इंगळे याला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली.
डोक्यात फरशीचे तुकडे घालून हत्या
यावेळी मयत इंगळे याच्या डोक्यात संशयित आंबेकरने दुभाजकांमध्ये पडलेल्या फरशीचे तुकडे डोक्यात घातले. यावेळी येथील काही नागरिकांनी तात्काळ अंबड पोलिसांना याबाबत सूचित केले. तर गंभीर जखमी असलेल्या आनंद इंगळे यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरु असताना आनंद इंगळे मयत झाल्याचे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, सहायक निरीक्षक वसंत खतेले, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नाईद शेख, योगेश शिरसाठ आदींसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
संशयित पोलिसांच्या ताब्यात
संशयितावर अंबड पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आनंद आंबेकर यास तात्काळ अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. मयत आनंद इंगळे याच्या पश्चात आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे.
पन्नास वर्षीय पुरुषाचा आढळला मृतदेह
सिन्नर (Sinnar) तालुक्यातील पांगरी शिवारात जाम नदीपात्रालगत खडकाच्या आडोशाला एका अनोळखी पन्नास वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. पांगरी बुद्रुक चे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष चंद्रभान दळवी यांनी वावी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. सदर व्यक्ती वाटसरू असल्याचे सांगण्यात येते. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या व्यक्तीला पोलिसांनी रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता त्याचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
आणखी वाचा
EVM Machine Theft : मोठी बातमी! तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला, कंट्रोल युनिट लंपास