Nashik : नाशिक हादरलं! अल्पवयीन बालिकेवर अत्याचार, संशयितास 14 दिवसांची पोलीस कोठडी
Nashik Crime : नाशिकमध्ये अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर 56 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे.
नाशिक : भंडारा जिल्ह्यातील महिलेवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता नाशिक अत्याचाराच्या घटनेने हादरल आहे. नाशिक शहरातील सिडको परिसरात एका नऊ वर्षीय बालिकेवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिकच्या शहरातील सिडको परिसरात अवघ्या नऊ वर्षांच्या चिमुरडीवर 56 वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी विरोधी पोस्को अन्वये बलात्कार, व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यन्वये (ॲट्रोसिटी) अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने संशयिताला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर त्र्यंबक पाटील असे संशयित नराधमाचे नाव आहे. संशयित ज्ञानेश्वर पाटील हा पीडितेच्या कुटूंबियांतील ओळखीचा असून, घराजवळच राहत आहे. मुलीवर नजर ठेवून त्याने पीडित अल्पवयीन मुलीला रस्त्यात एकटीला गाठत घराच्या पाठीमागे नेले आणि त्याठिकाणी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.
दरम्यान पीडित मुलीला वडील नाहीत याचा गैरफायदा घेत संबंधित संशयितांने मुलीस हा प्रकार कुणालाही सांगितला तर आईला मारून टाकेन अशी धमकी दिली. घरी आल्यानंतर सदर प्रकार मुलीच्या आईच्या निदर्शनास आला. पीडितेच्या आईने अंबड पोलिस ठाणे गाठत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयिताविरोधात पोस्को (बाल लैगिंग अत्याचार संरक्षण अधिनियम) अन्वये बलात्कार व ॲट्रोसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितास अटक करून जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यास 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख हे करीत आहेत.