CM शिंदेंच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्ताला जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात, 12 पोलीस जखमी, नाशिकमधील घटना
Nashik Accident News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात 12 पोलीस जखमी झाले आहेत.
Nashik Accident News नाशिक : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून पालमकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. या दौऱ्याच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या (Police) गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
चांदवड (Chandwad) जवळील राहुड घाटात (Rahud Ghat) पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात (Nashik Accident News) झाला आहे. या अपघातात 12 पोलीस जखमी झाले आहेत. यातील एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. जखमींपैकी काही पोलिसांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात नेमका कसा घडला? याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
जखमींवर उपचार सुरु
अपघातातील जखमींना तातडीने चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून चालक पुरुषोत्तम मोरे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेत सोमा टोल कर्मचाऱ्यांच्या मदतीने जखमींना मदतकार्य केले. तसेच निलेश लोंढे, जयवंत चौधरी, कुमार जाधव, किरण आहेर, चेतन तुंगर, निलेश खंडाळे, शीतल गायकवाड, किशोर बोडके, नानाजी मारवांडे, शांताराम गाढे, निलेश आहीरे हे पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
वणी-नाशिक महामार्गावरही भीषण अपघात
दरम्यान, वणी-नाशिक महामार्गावर (Vani Nashik Highway) कृष्णगाव शिवारात दुचाकी व आयशरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णगाव शिवारात वणी- दिंडोरी रोडवर बुधवारी आयशर (केए 13 डि 5584) जात असताना अचानक ब्रेक मारल्याने पाठीमागून येणारी दुचाकी (एमएच 15 जेजे 2924) आयशरवर धडकली. यात दुचाकीस्वार युवराज रवींद्र पवार (40, रा. वहऱ्हाणे, ता. मालेगाव) यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दीप्ती युवराज पवार (38, रा. गौळाणे रोड, पाथर्डी, नाशिक) यांनी फिर्याद दिल्याने वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या