Nashik Accident: नाशिकच्या भीषण अपघातात पुण्याच्या आयटी कंपनीतील एकटा विक्रांत कसा वाचला? आक्रित घडण्यापूर्वी मृत्यू समोर दिसला
dwarka flyover accident Nashik: नाशिकमध्ये रविवारी भीषण अपघात झाला. यामध्ये एका ट्रकमधील लोखंडी सळ्या टेम्पोत बसलेल्या लोकांच्या अंगात शिरल्या. 7 जणांचा मृत्यू
नाशिक: नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. एका धार्मिक कार्यक्रमावरुन काही लोकांना घेऊन टेम्पो नाशिकमध्ये परतत होता. त्यावेळी हा टेम्पो द्वारका उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला जाऊन धडकला होता. या ट्रकमधील लोखंडी सळ्या बाहेर लोंबकळत असल्याने धडक झाल्यानंतर त्या टेम्पोच्या काचा फोडून पाठीमागच्या बाजूला बसलेल्या लोकांच्या शरीरात शिरल्या होत्या. त्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या टेम्पोतून प्रवास करणारा विक्रांत ठाकूर हा एकमेव व्यक्ती सुखरुप बचावला. कारण तो अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून खाली उतरला होता. टेम्पोचा चालक बेदरकारपणे वाहन चालवत आहे, हे त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे विक्रांतने टेम्पोतून उतरण्याचा निर्णय घेतला आणि तो बचावला.
या सगळ्या घटनेबाबत सांगतान विक्रांत म्हणाला की, आम्ही रविवारी चार वेगवेगळ्या वाहनांनी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धारणगावातून नाशिकच्या दिशेने निघालो होतो. चालक टेम्पो वेगात चालवत होता. मी यावरुन चालकाला हटकले. परंतु, त्याने ऐकले नाही. ओढ्याचा टोल चुकविता यावा याकरिता सय्यद पिंपरीमार्गे जाऊ असे कुणीतरी बोलले. टोलचे 135 रुपये मी देतो, असे मी त्यांना सांगितले. परंतु, टोल वाचविण्याकरिता त्यांनी टेम्पो सय्यद पिंपरी मार्गे वळविला. चालक वाहनाचा वेग कमी करीत नसल्याने आडगाव परिसरात मी वाहनातून उतरलो. इतरांनाही दुसऱ्या वाहनातून जाऊ असे सांगितले. परंतु 'जाऊ दे, 'आता थोडेच अंतर जायचे आहे' असे सांगत ते या टेम्पोतच बसून राहिले. यानंतर थोड्याचवेळात अपघात झाला, असे विक्रांतने सांगितले.
या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले आणि जखमी झालेले सर्वजण सिडकोच्या सह्याद्रीनगर आणि अंबड परिसरातील रहिवासी होते. बहुतांश जण कामगार कुटुंबातील होते. विक्रांत ठाकूर हा पुण्याच्या मगरपट्टा येथील आयटी कंपनीत नोकरीला आहे. तो सह्याद्रीनगरातील अन्य मित्रांसोबत तोही कारणाच्या कार्यक्रमाला गेला होता. मात्र, वेळीच टेम्पोतून उतरल्यामुळे त्याचा जीव वाचला. मात्र, आपल्या सवंगड्यांची अंत्ययात्रा निघताना पाहून विक्रांत प्रचंड रडला. दरम्यान, या अपघातानंतर वाहतूक विभाग आणि पोलिसांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती.
आणखी वाचा
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...