Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Dwarka Flyover Accident : नाशिकमधील अपघातात घडण्यापूर्वी एक तरुण पिकअपमधून खाली उतरल्याने सुदैवाने त्याचा जीव वाचला.
Nashik Accident : नाशिकच्या उड्डाणपुलावर द्वारका परिसरात रविवारी रात्री भीषण (Nashik Accident News) अपघात झाला. एक पिकअप ट्रक लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. यानंतर मागून येणाऱ्या वाहनाने पिकअपला जोरदार धडक दिल्याने पिकअप दोन्ही वाहनांमध्ये चिरडला गेला. यावेळी ट्रकमधील लोखंडी सळ्या पिकअपच्या काचा फोडून आतमध्ये शिरल्या आणि तरुण मुलांच्या शरीरात घुसल्या. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी आहेत. हा अपघात घडण्यापूर्वी पिकअपमधील एक तरुण आडगावजवळ उतरल्याने त्याचा जीव सुदैवाने वाचला. मात्र, काही वेळातच आपले मित्र अपघातात गेल्याची बातमी समजताच त्याला धक्का बसला.
पुण्यातील मगरपट्टा येथील एका आयटी कंपनीत विक्रांत ठाकूर हा तरुण नोकरीला आहे. सिडकोच्या सह्याद्रीनगर परीसरातील अन्य मित्रांसोबत विक्रांतदेखील निफाडच्या धरणगाव येथे अपघात झालेल्या पिकअपनेच गेला होता. चार वाहने रविवारी सकाळी धारणगावकडे मार्गस्थ झाले होते. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते पुन्हा नाशिकमध्ये मार्गस्थ झाले. यानंतर आडगावजवळ विक्रांत हा पिकअपमधून खाली उतरला आणि त्याचा सुदैवाने जीव वाचला आहे.
चालकाची बेदरकार ड्रायव्हिंग खटकली, अन् वाहनातून खाली उतरला
विक्रांत ठाकूरने माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, सायंकाळी नाशिककडे निघाल्यावर चालक वेगाने पिकअप चालवित होता, तर मुले एन्जॉय करीत होती. चालक बेदरकारपणे वाहन चालवित असल्याची जाणीव आपण त्याला करून दिली होती. त्यानंतर ओढ्याचा टोल चुकविता यावा याकरिता टेम्पो सय्यद पिंपरीमार्गे वळविण्यात आला. चालक वाहनाचा वेग कमी करीत नसल्याने आडगाव परिसरात मी वाहनातून उतरलो. इतरांनाही दुसऱ्या वाहनातून जाऊ, असे मी सांगितले होते. मात्र, आता थोडेच अंतर जायचे आहे, जाऊ दे, असे सांगत मित्रांनी त्या टेम्पोतच प्रवास केला, असे त्यानी म्हटले आहे.
'विक्रांत'च्या अश्रूचा बांध फुटला!
यानंतर नाशिकच्या उड्डाणपुलावर पिकअप लोखंडी सळ्या असलेल्या ट्रकला जाऊन धडकला. या भीषण अपघातात पिकअपमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 13 जण गंभीररीत्या जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच विक्रांतला मोठा धक्का बसला आणि त्याच्या अश्रूचा बांध फुटला. दरम्यान, नाशिक अपघातातील मृतांची संख्या आता सात वर पोहोचली आहे. दोन जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नाशिकवर शोककळा पसरली आहे.
आणखी वाचा