Nashik Corona : बारा लाख नागरिकांचे लसीकरण झालंच नाही, नाशिककरांची बूस्टर डोसकडे पाठ!
Nashik Corona : लाखो नाशिककरांनी बूस्टर डोस घेतला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
Nashik Corona : नाशिक (Nashik) शहरातून कोरोना (Corona) नामशेष झाला, या अविर्भावात नाशिककर वावरत असून जवळपास 12 लाख नागरिकांनी बूस्टर डोस घेतला नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यांच्या लसीकरणासाठी पालिका पुन्हा एकदा सज्ज झाली आहे.
चीनमध्ये (China) कोरोनाची लाखो रुग्ण आढळल्यानंतर केंद्र व राज्य शासनाने (State Government) सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर नाशिक महापालिका (Nashik NMC)पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लसीकरण करून घेण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज झाली आहे. 13 लाख 63 हजार लाभार्थ्यांपैकी जेमतेम एक लाख 64 हजार लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक डोस घेतल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. एप्रिल 2020 नंतर आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत 76 हजार नागरिकांना या आजाराचा संसर्ग झाला तर एक हजाराहून अधिक लोकांचा यात बळी गेला. सप्टेंबर 2021 मध्ये आलेली कोरोनाची दुसरी हाहाकार माजवणारी ठरली. या लाटेत सर्वाधिक दीड लाखांवर नवे कोरोना बाधित आढळले तर सुमारे 3 हजार जणांचा या आजाराने बळी घेतला होता, त्या तुलनेत फेब्रुवारी 2022 मध्ये आलेली कोरोनाची तिसरी लाट सौम्य ठरली होती.
दरम्यान तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेला ओमायक्रोनची शहरातील 50 हजार जणांना लागण झाली खरी परंतु ओमायक्रोनच्या संसर्गामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण दुसऱ्या लाटेच्या तुलनेत कमी होते. त्यानंतर कोरोनाच्या सर्व नियम शिथिल झाल्याने नाशिककरांनी देखील पूर्वीप्रमाणे लग्न सोहळे, बाजारपेठांमध्ये गर्दी करण्यात सुरुवात केली. दरम्यान या काळात मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंग त्रिसूत्रीचा नाशिककरांना विसर पडत आहे. जून महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. मात्र त्यानंतर नाशिककरांनी सतत सतर्कता बाळगल्यामुळे पूर्ण संख्या कमी झाली. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपासून चीनमध्ये कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ झाली असून त्यामुळे केंद्र शासनाने देशपातळीवर खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्य शासनाने 15 जुलै 2022 पासून शहरात अठरा वर्षांनी त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस दिला जात आहे.
नाशिक शहरात पात्र असलेल्या 13 लाख 63 हजार 700 नागरिकांपैकी एक लाख 64 हजार 316 लाभार्थ्यांनी मोफत डोसचा लाभ घेतला आहे. तसेच यातील फ्रंटलाईन वर्कर आणि वय वर्ष साठवरील नागरिकांनी पूर्वीच बुस्टर डोस घेतला होता. 15 जुलै 2022 पासून 18 वर्षावरील नागरिकांना मोफत गोष्ट डोस देण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता उर्वरित बारा लाख नाशिककरांना बूस्टर डोस कसा देता येईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ज्यांनी कोणतेही लस घेतले नाही, त्यांना पहिली लस देऊन त्यानंतर दुसरी लसीचा बूस्टर डोस दिला जाईल, असं नियोजन नाशिक महापालिकेकडून करण्यात आलं आहे.