Nashik News : नांदगावच्या डॉक्टरवाडी-पांझणमधील टीपी सूर्याचा प्रकल्प सील, वनविभागाची कारवाई
Nashik News : नांदगाव येथील वनजमिनीवर परस्पर उभारण्यात आलेला सौर ऊर्जा प्रकल्प वनविभागाकडून सील करण्यात आला आहे.
Nashik News : नांदगाव तालुक्यातील (Nandgoan) डॉक्टरवाडी व पांझण येथील वनजमिनीवर बेकायदा उभारण्यात आलेला सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प (Solar Power Generation Project) वनविभागाने सील केला. दक्षता पथक आणि प्रादेशिक विभागाने संयुक्तरीत्या 'ऑपरेशन सोलर' (Operation Solar) राबवत धडक कारवाई केली. त्यामुळे जिल्ह्यातील राखीव वनजमिनीवरील अतिक्रमण थाटणाऱ्या भूमाफियांसह त्यांना संरक्षण देणाऱ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून वन जमिनीवर खासगी अतिक्रमणे वाढत असून पर्यावरणप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. शहरातील पांजरपोळ वनजमिनीचा मुद्दा चर्चेत असताना जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील वनजमिनीवर झालेल्या अतिक्रमणबाबत वनविभागाने महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी राखीव वनजमीनीच्या बेकायदेशीर खरेदी विक्री प्रकरण बाबतचा पूर्व वन विभागाचे उपवन संरक्षक उमेश वावरे यांनी जिल्हा प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार नांदगाव वनपरिक्षेत्राच्या तळवाडे नियतक्षेत्रातील डॉक्टरवाडी व पांझण येथे सुमारे 400 एकर वनक्षेत्र 1963 मध्ये महसूल विभागाला वाटप झाले होते. महसूल विभागाने वनविभागाची परवानगीन घेताच हे क्षेत्र सोसायट्यांना उपजीविकेसाठी वाटप केले होते. दिल्लीच्या टी. पी. सौर्या कंपनीनेही वनविभागाची परवानगी न घेता संबंधित सोसायटीकडून परस्पर क्षेत्र खरेदी करून वन संज्ञेतील जमिनीवर कोट्यवधी रकमेचा शंभर मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारल्याचे उघड झाले होते.
या संदर्भात वनविभागाला कुणकुण लागल्यानंतर टी. पी. सूर्या कंपनीवर वनगुन्हा दाखल करून खुलासा करण्याची नोटीस बजाविली होती. मात्र तरीदेखील संबंधित कंपनीकडून काम सुरूच ठेवल्याने मुख्य उप वनसंरक्षक उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन सोलर राबविण्यात आले. प्रकल्पाचे सर्व साहित्य व ट्रान्समिशन यंत्रणा जप्त करून त्याच्या पावतीद्वारे सर्व साहित्य संबंधित कंपनीच्या ताब्यात देण्यात आले. तसेच वीज विक्रीला पायबंद करण्यासाठी तहसीलदारांमार्फत महावितरणला पत्र देण्यात आले होते.
काय आहे ऑपरेशन सोलर?
दरम्यान अनेक दिवसांपासून संबंधित बेकायदेशीर सौर ऊर्जा प्रकल्पाविषयी वनविभाग सतर्क झाल्यानंतर 'ऑपरेशन सोलर' राबविण्याचे ठरविले. यात सहायक वनसंरक्षक सुजित नेवसे यांसह वणी दक्षता पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पवार, सुरगाणा पथकाचे रवींद्र भोगे, नांदगावचे अक्षय म्हेत्रे या अधिकाऱ्यांसह शंभर अधिकारी, कर्मचारी व 15 वाहनांसह पोलिस व वन कर्मचाऱ्यांचा सशस्त्र बंदोबस्त होता. सशस्त्र वनाधिकाऱ्यांसह पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात संपूर्ण प्रकल्प 'सील' करून साहित्य जप्त करण्यात आले. संपूर्ण कारवाईचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शूटिंग करून पुढील आदेशापर्यंत काम बंद ठेवण्याचे निर्देश संबंधित कंपनीला देण्यात आले. कारवाईदरम्यान दोन्ही ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता.