सुट्टी मिळण्यासाठी चक्क बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव, शेतमजुराने पसरवलेल्या अफवेमुळे वनविभाग हैराण
सुट्टी मिळण्यासाठी चक्क बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव सोलापुरात समोर आला आहे. शेतमजुराने पसरवलेल्या अफवेमुळे वनविभाग हैराण झाले.
सोलापूर : कामावरुन सुट्टी मिळावी यासाठी तुम्ही आतापर्यंत वेगवेगळे बहाणे केल्याचे ऐकले असतील. सोलापुरात मात्र एका शेतमजुराने हद्दच केली. कामावरुन सुट्टी मिळावी यासाठी चक्क बिबट्याने हल्ला केल्याची अफवा या मजुराने पसरवली. काही वेळातच ही अफवा वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे या अफवेला दुजोरा देण्यासाठी दुसऱ्या राज्यातील एक व्हिडियो देखील वायरल केला जाऊ लागला. त्यामुळे परिसरात एकच भितीचे वातावरण पसरले. या घटनेमुळे वनविभागाचे मात्र हाल झाले.
सोलापुरातील अकोलेकाटी येथे दुपारी 3 च्या सुमारास बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्याची चर्चा होऊ लागली. यासाठी चर्चासोबत एक विडिओ देखील वायरल केला जात होता. ज्यामध्ये बिबट्या सदृश प्राणी पळताना दिसतोय. तर काही लोक त्यामागे पळताना देखील दिसत होते. ही माहिती वाऱ्यासारखी सोलापुरात पसरू लागली. सोलापूरच्या वनविभागाला ही माहिती कळताच वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळी घटनास्थळी पाहणी केली. त्यावेळी घटनास्थळावर बिबट्यासदृश प्राण्याच्या पायाचे कोणतेही ठसे आढळून आले नाही. तसेच शेतमजूर भारत शामराव गवळी वय 72 यांची चौकशी देखील केली. या चौकशीत गवळी यांनी दिलेले उत्तर हे असमाधानकारक होते. 'शेतात काम करत असताना अचानकपणे मागून कोणी तरी हल्ला केला. कोणी तरी व्यक्ती आहे असं समजून मी पाठिमागे वळून पाहिलं. तर पाठीवर प्राणी होता. त्याने माझी मान धरण्याचा प्रयत्न केला. इतक्यात मी त्याचे दोन्ही कान पकडून समोर आपटले. त्याच्यावर गुडघा ठेवला. जवळ असलेल्या कुऱ्हाडीने मारलं असता त्याने तिथून पळ काढला.' अशा प्रकारचा जबाब या शेतमजुराने दिला. मात्र, वनविभागाने त्याला काही प्राण्यांचे फोटो दाखवले असता त्याने बिबट्याचे फोटो ऐवजी वाघाचे फोटो दाखवले.
तसेच मजुराच्या पाठीवर हल्ला झाल्याची तपासणी देखील वैद्यकीय तज्ञांकडून करुन घेण्यात आली. मात्र, यावेळी मजुराच्या पाठीवर कोणतेही जखम नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मजुराने ही सगळी माहिती खोटी सांगितल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान 'मजुराने सकाळी मद्यप्राशन केले होते. त्यामुळे त्याला काम करण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने जाणीवपुर्वक खोटी अफवा पसरवली. अशा प्रकारच्या अफवांमुळे शेतकरी अडचणीत येतो.' अशी प्रतिक्रिया शेतकरी सुधाकर प्रभाकर क्षिरसागर यांनी दिली.
अफवेमुळे वनविभागाचे अधिकारी - कर्मचारी हैराण
काही दिवसांपूर्वी सोलापुरातल्या कोंडी परिसरात बिबट्याच्या पायाचे ठशे आढळले होते. त्यामुळेच मजुराने ही अफवा पसरवल्याची शक्यता आहे. मात्र, मजुराने पसरविलेल्या अफवेमुळे वनविभागाचे अधिकारी कर्मचारी हैराण झाले. घटना खरी समजून वनविभागाचे केवळ सोलापूर मुख्यालयातीलच नव्हे तर इतर तालुक्यातील अधिकारी कर्मचारी देखील प्राण्याला जेरबंद करण्याच्या तयारीनिशी तात्काळ पोहोचले. मात्र, या अफवेमुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे श्रम वाया गेले. त्यामुळे नागरिकांनी अफवा न पसरवू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. असा इशारा देखील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.