MPSC Success Story : व्वा! पोरी जिंकलस, दिंडोरीच्या अहिवंतवाडीची पौर्णिमा MPSC त राज्यात पहिली, वडिलांच्या कष्टाचं चीज झालं!
MPSC Success Story : वडिलांच्या प्रेरणेला कष्टाची जोड देऊन दिंडोरीच्या अहिवंतवाडीची पौर्णिमा गावित एमपीएसीच्या परीक्षेत राज्यात पहिली आली.
Nashik Success Story : एक दिवस वडिलांसोबत नाशिकच्या (Nashik) जिल्हाधिकारी कार्यालयात गेली. जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक अधिकारी पाहून वडिलांनी असच तुला व्हायचंय, ही प्रेरणा दिली. या प्रेरणेला कष्टाची जोड देऊन आज महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिली आली. जीवनातील कोणतेही ध्येय परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या चतु:सूत्रीच्या जोरावर साध्य करता येते. याच उत्तम उदाहरण म्हणजे पौर्णिमा गावित (Paurnima Gavit). पौर्णिमाने कष्टातून मिळवलेल्या या यशामुळे अहिवंतवाडीचे नाव राज्याच्या नकाशावर कोरले आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी (Dindori) तालुक्यातील अहिवंतवाडी हे पौर्णिमाचे गाव आहे. या वाडीत पौर्णिमाचे वडील विठोबा शिवराम गावित हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पौर्णिमा स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून पालिका उपायुक्ताची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तिचे प्राथमिक शिक्षण हे अहिवंतवाडीत झाले तर सहावी ते बारावी पर्यतचे शिक्षण हे दिंडोरी तालुकयातील खेडगाव येथील नवोदय विद्यालयात झाले आहे. त्यानंतर तिने तिने राहुरी (Rahuri) येथील कृषी विद्यापीठात बीएस्सी अॅग्री कॅल्चरची पदवी प्राप्त केली. त्यानंतर गेट परीक्षेच्या माध्यमातून आयआयटी खरगपुर (IIT Khargapur) येथे एमएस्सी अॅग्री कॅल्चरची पदवी प्राप्त केली. यानंतर ती थांबली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात ठरविलेल्या स्वप्नांकडे तिने झेप घेत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत कुटुंबाचं नाव उज्ज्वल केले आहे.
तत्पूर्वी पौर्णिमाने एमएस्सी अॅग्री कॅल्चरची पदवी प्राप्त केल्यानंतर पुणे (Pune) येथील स्पर्धा परीक्षा केंद्राची प्रवेश परीक्षा देत उत्तीर्ण होत प्रवेश मिळवला. त्यानंतर सलग दोन वर्ष रात्रीचा दिवस करत मेहनत घेत अभ्यास केला. सुरुवातीला तिने यूपीएससी परीक्षा दिली, मात्र त्यात यश येत नव्हते. नंतरच्या काळात कोरोनामुळे घरची वाट धरावी लागली. या काळात तिने एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्याच प्रयत्नात ती उत्तीर्ण होत 2020 साली कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयात निवडही झाली. पण तिने ते नाकारुन पुढे परीक्षा सुरु ठेवल्या. त्यानुसार तिसऱ्या प्रयत्नात पौर्णिमाने यशाला गवसणी घालत थेट महापालिका उपायुक्त पदी निवड झाली. या पदासाठी तिचे यशदा पुणे येथे ट्रैनिंग असणार आहे. विशेष म्हणजे अनुसूचित जमाती मुलींमध्ये राज्यात पहिला येण्याचा मानही मिळवला. या यशाने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिवाय आदिवासी समाजातील मुलींसाठी तिने एक आदर्श निर्माण केला आहे.
स्पर्धा परीक्षा देताना प्लॅन बी आवश्यक....
दरम्यान यश मिळाल्यावर पौर्णिमा गावित म्हणाली कि, अतिशय आनंद होत आहे, आईवडिलांच्या स्वप्नांना साकार करण्याचे बळ मिळाले. म्हणून आज हे यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा मन लावून अभ्यास केला, ध्येय निश्चित ठेवले तर यश हमखास मिळते. आजच्या घडीला अनेक विद्यार्थी आई वडिलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी जीवाचं रान करत असतात. मात्र अनेकदा दोन तीन वर्ष होऊनही अपयश मिळतं असते. यासाठी विद्यार्थ्यांनी पहिल्यापासूनच प्लॅन बी ठेवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना करियरसाठी अनेक क्षेत्र आहेत. त्यामुळे एमपीसीसी करत असताना प्लॅन बी तयार ठेवणे क्रमप्राप्त आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींना तसामोरे जाऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता येते. बार्टीसारख्या अनेक संस्था असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह निर्वाह भत्ता देखील दिला जातो.