Success Story: स्वतःचं बलस्थान ओळखलं अन् दुसऱ्याच प्रयत्नात राज्यात दुसरा, कोल्हापूरच्या शुभम पाटीलची MPSC परीक्षेत कमाल
MPSC Result: एमपीएससीचा अभ्यास करताना हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्कवर जास्त भर दिला आणि कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त वेळा वाचली असं शुभम पाटीलने सांगितलं.
मुंबई: एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये कोल्हापुरातील शुभम गणपती पाटील (Shubham Patil) याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. दुसऱ्याच प्रयत्नात शुभमने राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जिद्द, चिकाटी, अभ्यासाचं नियोजन आणि योग्य मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाल्याचं शुभमने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
शुभम पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील साजनी या गावचा. शुभमचे वडील गणपती पाटील हे प्राथमिक शिक्षक तर आई गृहिणी. लहानपणापासून सरकारी अधिकारी व्हायचं हे शुभमचं ध्येय, आणि त्याला त्याच्या आई-वडिलांनी साथ दिली.
पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बीएसस्सी केमेस्ट्री या विषयातून शुभमने पदवी घेतली. पण पदवीचा अभ्यास करत असल्यापासूनच शुभमने स्पर्धा परीक्षेचाही अभ्यास सुरू केला. या महाविद्यालयाच्या वातावरणाचा फायदा झाल्याचं शुभम सांगतो. त्या काळात शुभमने सर्व बेसिक पुस्तकं, एनसीईआरटीची पुस्तकं वाचून काढली होती. पदवी घेतल्यानंतर मात्र शुभमने अधिक जोमाने अभ्यास केला.
शुभमने 2020 सालची राज्यसेवा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो राज्यात 22 वा आला. अतिशय काटेकोरपणे अभ्यासाचे नियोजन केल्यामुळे शुभमला हे यश मिळालं. त्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या शुभमने यंदाच्या एमपीएससीमध्ये राज्यात दुसरा येण्याचा मान मिळवला.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. या मार्गावर अनेक आव्हानं असतात असं शुभम सांगतो. अनेक वेळा निराशा येते आणि अभ्यास सोडून द्यावा असा विचार मनात येतो. अनेकवेळा अभ्यासात मन लागत नाही. काही वेळा पूर्व परीक्षेत अपयश येतं तर काही वेळा मुख्य परीक्षेतून बाहेर पडावं लागतं. पण अभ्यासात सातत्य आणि चिकाटी असेल तर यश नक्की मिळतं असं शुभम सांगतो.
MPSC Result: अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय होती?
अभ्यास करताना हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्कवर जास्त भर दिला. सिलॅबस समजून घेतला. गेल्या पाच वर्षातील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं. कमीत कमी पुस्तकं आणि जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन हा फॉर्म्युला अमलात आणला. या सर्वाचा फायदा झाला आणि दुसऱ्याच प्रयत्नात मोठं यश मिळालं असं शुभम पाटील सांगतोय.
Kolhapur's Shubham Patil tops MPSC: शासकीय सेवेत का यायचं ठरवलं?
शासकीय अधिकाऱ्यांना मिळणारा आदर, त्यामुळे आपल्या आई-वडिलांची मिळणारा आदर यामुळे सुरुवातीपासूनच शासकीय सेवेत यायचं असं ठरवल्याचं शुभम पाटील सांगतो. शासकीय अधिकाऱ्यांसमोर रोज नवी आव्हानं असतात, त्यांना सामोरं जाताना आपल्या व्यक्तीमत्वामध्ये एक प्रकारचा सकारात्मक बदल होताना दिसतो. शासकीय अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या अधिकारामुळे एखाद्याचं जर भलं होत असेल तर त्यामुळे मिळणारं समाधान वेगळंच असतं. या सर्व गोष्टी लक्षात घेता खासगी क्षेत्रापेक्षा क्लास वन अधिकारी व्हायचं ठरवल्याचं शुभमने सांगितलं.
या अभ्यासाच्या प्रवासात अनेक लोकांनी मदत केली. त्यामध्ये आई-वडील आणि भाऊ-वहिनीची मोठी साथ मिळाल्याचं शुभम सांगतो. पुण्यात असलेल्या मित्रांनी मोठा आधार दिला, त्यामध्ये ओमकारचे नाव घ्यायला आवडेल असं शुभम म्हणाला.
प्रशासकीय अधिकारी आणि नागरिकांच्यातील दरी कमी करणार, त्यांच्यातील थेट संबंध वाढवण्यावर भर देणार असल्याचं शुभमने सांगितलं. नागरिकांना सहज उपलब्ध होईल असा अधिकारी बनण्याचं आणि समाजाने वाळीत टाकलेल्या तृतीयपंथिय समूदायासाठी काम करण्याची इच्छा शुभमने व्यक्त केली.
विद्यार्थ्यांना काय संदेश...
स्पर्धा परीक्षेची तयारी लाखो विद्यार्थी करत असतात, त्यामुळे सक्सेस रेशो कमी असतो. म्हणून या क्षेत्रात येण्यापूर्वी अनेकदा विचार करा, तसेच अभ्यास करताना सोबत प्लॅन बी तयार ठेवा असं शुभमने सांगितलं. स्वतःची बलस्थाने ओळखा... यश तुमचंच असेल असं शुभम पाटील सांगतो.
ही बातमी वाचा: