Nashik Crime : वडिलांना गायब केल्याचा राग, सिन्नरमध्ये युवकाने नातेवाईकाचाच काटा काढला...
Nashik Crime : वडिलांना गायब केल्याचा राग मनात धरून गावातीलच नातेवाईकाचा काटा काढल्याचे नाशिक पोलिसांनी उघडकीस आणले.
Nashik Crime : नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik Pune Highway) सिन्नरकडे येणा-या रोडवर अन्नपूर्णा हॉटेलजवळ झालेल्या खुनाचा उलगडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत केला असून वडिलांच्या गायब होण्यामागे संबंधित मयत तांबे यांचा हात असल्याचा राग मनात धरून संशयिताने खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांत चार ते पाच खुनाच्या (Murder) घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या सर्व घटनांतील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी गुन्हेगारी मात्र कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. अशातच फेब्रुवारीच्या एक तारखेला सिन्नर (sinnar) परिसरात घोंडवीरनगर शिवारात संपत रामनाथ तांबे यास अज्ञात संशयिताने धारदार शस्त्राने अंगावर वार करून त्याचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात (sinner Police) गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर काही तासांत या गुन्ह्याचा छडा लावण्यात सिन्नर पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी खुनाची घटना निदर्शनास आल्यानंतर तात्काळ पोलिसांनी धाव घेवून घटनास्थळाची पाहणी केली. यातील मयत संपत रामनाथ तांबे यांच्याबाबत सविस्तर माहीती घेतली असता, तो धोंडवीरनगर शिवार येथिल राहणार असल्याचे समजले. त्याचबरोबर आयशर वाहनावर बदली ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्याचा पार्श्वभूमी तपासली असता, त्याच्यावर गतवर्षी वावी पोलीस ठाण्यात चांगदेव सुखदेव तांबे यांचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
दरम्यान या प्रकरणातील यातील गायब असलेला व्यक्तीचा मुलगा प्रविण चांगदेव तांबे व मयत संपत तांबे यांच्यात वडीलांचे अपहरण केल्याच्या कारणावरून जुना वाद होता. त्यामुळे प्रविण तांबे याच्यावरील पोलीसांचा संशय बळावला. अधिक माहिती घेतली असता, प्रविण हा तळेगाव दाभाडे, पुणे येथे कामास असल्याची व घटनेच्या दिवशी तो गोंदे परिसरात असल्याची माहीती मिळाली. संशयिताचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके तयार करून रवाना करण्यात आली. त्यातील पुणे येथे तपासकामी गेलेल्या पोलीस पथकास संशयित तांबे हा निदर्शनास आल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याची पोलीस पथकाने विचारपूस केली असता, यातील मयत संपत तांबे याने संशयित प्रविण तांबे याचे वडिलांचे अपहरण केल्याचा राग मनात धरून त्याने 01 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गाने गोंदे ते सिन्नर जाणारे रोडवर मोटर सायकलने त्याचा पाठलाग केला. त्यास अन्नपूर्णा हॉटेलजवळ एकटा गाठून त्याच्याकडील धारदार तलवारीने संपत याच्या मानेवर, पोटावर, हातावर गंभीर वार करून जीवे ठार मारल्याचे संशयिताने कबुल केले.