(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Girish Mahajan : ' पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकायला लोकं ब्लॅकने तिकीट घेतात अन् हे शोभण्यासारखे, गिरीश महाजन यांचे वक्तव्य
Nashik Girish Mahajan : मोदींचे भाषण ऐकायला लोकं ब्लॅकने तिकीट घेतात अन् हे शोभण्यासारखे, गिरीश महाजन यांचे वक्तव्य
Nashik Girish Mahajan : 'मोदींचे भाषण (Narendra Modi) ऐकायला पहिल्याच दिवशी तिकीट फुल होत आहेत, लोकं ब्लॅकने तिकीट घेत असून हे शोभण्यासारखे आहे.'असं गिरीश महाजन (Girish Mahajan) बोलताच सभागृहात बसलेल्या व्यापाऱ्यांना हसू आवरेना झाले. 'आज चायनाही आपल्या नादी लागत नाही, नाहीतर पहिले बांग्लादेश पण आपल्याला डोळे दाखवायचे. आज अमेरिका पण आपल्याला पायघड्या टाकत आहे, सुपरपॉवर होण्याच्या मार्गावर आपण आहोत' असंही गिरीश महाजन म्हणाले.
भाजपचे संकट मोचक अशी ओळख असलेले ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण तथा क्रिडा मंत्री गिरीश महाजन (BJP Girish Mahajan) हे नेहमीच काही ना काही कारणास्तव चर्चेत असतात आणि आज अशाच एका वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेचा विषय ठरले आहेत. देशभर मोदी @9 हे जनसंपर्क अभियान भाजपकडून सध्या राबविण्यात येत असून पक्षाच्या याच अभियानाचा भाग म्हणून नाशिक (Nashik) शहर व्यापारी आघाडीच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या संमेलनाचे आयोजन नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले होते. गिरीश महाजन हे या काय्रक्रमाचे अध्यक्ष होते, मंचावर त्यांच्यासोबत शहरातील तिनही भाजप आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. याच कार्यक्रमात भाषण करतेवेळी मोदींच्या कामांची स्तुती करत असतांना हे विधान केले आहे.
गिरीश महाजन म्हणाले कि, 'मोदींचे भाषण ऐकायला पहिल्याच दिवशी तिकीट फुल होत आहेत, लोकं ब्लॅकने तिकीट (Black Ticket) घेत आहेत आणि हे शोभण्यासारखे आहे.' असं गिरीश महाजन बोलताच सभागृहात बसलेल्या व्यापाऱ्यांना हसू आवरेना झाले. 'आज चायनाही आपल्या नादी लागत नाही, नाहीतर पहिले बांग्लादेश पण आपल्याला डोळे दाखवायचे. आज अमेरिका पण आपल्याला पायघड्या टाकत आहे, सुपरपॉवर होण्याच्या मार्गावर आपण आहोत' असंही गिरीश महाजन म्हणाले. मोदींसारखे नेतृत्व आपल्या देशाला मिळाले आणि आपण आज कुठे गेलो आहे. जगभर मोदी फिरत आहेत. आताच एक बातमी आली की ते अमेरिकेला जाणार आहेत आणि त्यांना २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे. हा बहुमान पहिल्यांदा मोदींना मिळणार असल्याचे ते म्हणाले.
आज चीनही आपल्या नादी लागत नाही...
ते पुढे म्हणाले कि, आपण आजवर कधी ऐकले होते का? की मनमोहन सिंह गेले परदेशात आणि त्यांना तोफांची सलामी दिली, लोकं त्यांना बघायला रस्त्यांच्या दुतर्फ़ा उभे आहेत, त्यांचे भाषण ऐकायला ब्लॅकने तिकीट घेत आहेत, असे कधीच ऐकले नाही. मोदींच्या स्वागतासाठी केवढी तयारी होते आहे, किती गाजावाजा होतो, भाषण ऐकायला पहिल्याच दिवशी तिकीट फुल होत आहेत, लोकं ब्लॅकने तिकीट घेत आहेत. हे शोभण्यासारखे आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानानी मोदींना पायाला हात लावून नमस्कार केला, ती काय छोटी गोष्ट आहे का?.. मी 25 वर्ष आमदार आहे, पूर्वी आम्ही परदेशात जायचो तर लोकं आमच्याकडे बारीक डोळ्यांनी बघायचे आणि म्हणायचे, हे उधारीवाले येतात जातात. बघण्याचा दृष्टीकोन वेगळा होता, आज चायनाही आपल्या नादी लागत नाही, नाहीतर पहिले बांग्लादेश पण डोळे दाखवायचे. आज अमेरिका पण आपल्याला पायघड्या टाकत असून सुपरपॉवर होण्याच्या मार्गावर आपण असल्याचे ते म्हणाले.
मंत्रीमंडळ विस्ताराबाबत लवकरच निर्णय....
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आज नाशिक दौऱ्यावर होते. आज व्यापारी गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पत्रकरांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी अनेक विषयांवर त्यांनी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले कि, मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले आहेत चर्चा सुरू आहे, लवकरच निर्णय होईल.. खाते आणि नावानूसार चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या कोणत्या मंत्र्यांवर भाजप नाराज असे काहीही नाही.. शिवसेनेचा निर्णय मुख्यमंत्री घेत आहेत, भाजपचे भाजपकडे आहे. तर ठाकरे गटाच्या मनीषा कायंदे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याच्या चर्चा आहे. यावर गिरीश महाजन म्हणाले कि, ठाकरे गटाला रोजच धक्के बसत आहेत. त्यांना अनेक झटके बसत आहेत आणि पुढेही बसणार आहेत. सकाळच्या भोंग्याशिवाय कोणीही त्यांच्यासोबत कोणीही नाही. अनेक आमदार खासदारही पुढे त्यांना सोडून जाणार असल्याचे ते म्हणाले.