(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : 80 दिवसांत 800 किलोमीटर पार, नाशिकमध्ये पहिल्यांदाच नारीशक्तीच्या हाती लालपरीचं स्टिअरिंग
Nashik News : नाशिक एसटी विभागामध्ये नारीशक्तीच्या हाती लाल परीचे स्टिअरिंग जाणार आहे.
Nashik News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये (MSRTC) आता महिलासुद्धा चालकाच्या रूपामध्ये दिसणार आहेत. नाशिक विभागात आता 194 महिला लवकरच एसटी महामंडळामध्ये चालक म्हणून रुजू होत आहेत. त्यामुळे लवकरच नाशिक (Nashik) विभागामध्ये नारीशक्तीच्या हाती लाल परीचे स्टिअरिंग जाणार आहे.
महाराष्ट्रात एसटी महामंडळात पहिल्यांदाच महिला चालक दिसणार आहेत. नाशिक एसटी विभागामध्ये जवळपास 15 महिला या सध्या अंतिम प्रशिक्षण (ST Trainning) घेत आहेत. 2019 ला भरती प्रक्रिया झाली होती, मात्र कोरोनाचा काळ आल्याने भरती प्रक्रियेला ब्रेक लागला. गेल्या वर्षीपासून प्रशिक्षणाला सुरुवात झाली असून महिला चालकांची सध्या 80 दिवसांची अंतिम चाचणी सुरू आहे. या 80 दिवसांमध्ये 800 किलोमीटर चालकांना पार करावा लागणार आहे आणि अंतिम चाचणीमध्ये घाट रस्ता, महामार्ग, रात्रीच्या प्रवास या सगळ्याच पद्धतीने प्रशिक्षण सुरू करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थी चालक माधवी साळवे या म्हणाल्या की, एसटी महामंडळाने आमच्यासाठी ही एक नवीन संधी उपलब्ध केली आहे. आज महिला चालक म्हणून या क्षेत्रामध्ये उतरू शकू आणि एसटीची सुरक्षित सेवा असून महामंडळाचे 'प्रवाशांच्या सेवेसाठी' या ब्रीदवाक्याला अनुसरून काम असणार आहे.
आपल्या प्रत्येकाच्या घरी दुचाकी किंवा चारचाकी असते. आजपर्यंत महिला अनेक क्षेत्रात झळकत आहेत. तर वाहतुकीचे म्हटलं तर रिक्षा, शालेय वाहतूक करताना महिला दिसतात. त्यामुळे प्रवाशी वाहतुकीमध्ये महिलांचे प्रमाण खूपच कमी होतं. मात्र आता एसटीमध्ये हा नवीन प्रयोग पाहायला मिळत आहे. 2019 मध्ये एसटी महामंडळाने चालक व वाहकांची पदभरती जाहीर केली होती. त्यावेळी महिलांना अधिकाधिक प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे विचार केला की आपण या क्षेत्रात येऊन महिला चालक होण्याचा मान मिळवू शकतो, त्यामुळे एसटीत येण्याचा निर्णय घेतल्याची भावना चालक माधुरी साळवे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात आता महिलादेखील चालकाच्या रूपात दिसणार असून लवकरच 194 महिला या सेवेत रुजू होणार आहेत. नाशिक विभागात सध्या 15 महिला या अंतिम चाचणी देत असून प्रशिक्षण पूर्ण होताच शासनाच्या आदेशानुसार पुढील भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या क्षेत्रात महिलांनाही प्राधान्य दिल्याने प्रशिक्षणार्थी चालकांकडून सरकारचे आभार मानले जात असून ही जबाबदारी आम्ही उत्तमरित्या पार पाडून प्रवाशांना सुरक्षित सेवा देऊ असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जातोय.