Nashik Airport : अखेर पंधरा दिवसांनंतर नाशिक विमानतळ सुरु, नाशिक-दिल्ली-हैदराबाद पूर्ववत
Nashik Airport : ओझर विमानतळ पुन्हा एकदा विमान सेवेसाठी खुले करण्यात आले आहे.
Nashik Airport : गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेले ओझर विमानतळ (Ojhar Airport) मागील पंधरा दिवस दुरुस्तीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आले होते. अखेर ओझर विमानतळ पुन्हा एकदा विमान सेवेसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे मागील दोन आठवड्यापासून बंद असलेली नाशिक - दिल्ली आणि हैदराबाद सेवा पूर्ववत सुरू होणार असल्याचे समजते.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे व्यवस्थापन असलेल्या नाशिक विमानतळाची धावपट्टी देखभालीच्या कामामुळे 21 नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली होती. जवळपास पंधरा दिवस हे काम सुरु होते. अखेर विमानसेवा पुन्हा सुरळीत सुरु झाली असून नाशिक-दिल्ली आणि नाशिक-हैदराबाद या दोन उड्डाणे विमान कंपनीने रविवारपासून पुन्हा सुरू केली आहे. दरम्यान, स्पाइस जेटने (Spice Jet) अहमदाबाद सेवा सुरू करावी, यासाठी पाठपुरावा सुरू असून, त्या दृष्टीने मध्यंतरी यासंदर्भात बैठक देखील झाली आहे. मात्र निर्णय झालेला नाही. नाशिक विमानतळाची धावपट्टी 15 दिवसांनंतर व्यावसायिक आणि संरक्षण विमानांसह उड्डाण संचालनासाठी पुन्हा खुली करण्यात आली आहे.
ओझर विमानतळ 13 दिवस बंद असल्याने अडचण निर्माण झाली होती. त्याच सुमारास स्पाइस जेटची विमान सेवाही ठप्प झाली होती. तर दिवाळीच्या दरम्यान स्टार एअरची नाशिकमधील विमान सेवा ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे नाशिकच्या विमानसेवेवर विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. अशातच नाशिक लोकप्रतिनिधीनी पाठपुरावा करून मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहिले होते. मुख्यमंत्र्याकडे नाशिक संदर्भात खासदार हेमंत गोडसे यांनी बैठक घेऊन या प्रश्नावर लक्ष घालण्यास सांगितले होते. त्यानंतर देखील स्टार एअर सोडली तर इतर सर्व विमानसेवा ठप्प झाल्या. त्यानंतर विमानतळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. आता ओझर विमानतळ प्रवाशांसाठी पूर्ववत झाले आहे.
विमान कंपन्यांच्या प्रतीक्षेत....
सद्यस्थितीत नाशिकमध्ये उडान योजनेंतर्गत सुरू असलेल्या विमान सेवा जवळपास बंद झाल्या असून, केवळ स्पाइस जेटची नाशिक-दिल्ली आणि नाशिक-हैदराबाद या दोन शहरांना जोडणारी विमानसेवाच सुरू आहे. नाशिक-दिल्ली आणि नाशिक-हैदराबाद या दोन उड्डाणे विमान कंपनीने रविवारपासून पुन्हा सुरू केली. काही दिवसांपूर्वी नाशिक विमानतळाची धावपट्टी 15 दिवसांसाठी व्यावसायिक आणि संरक्षण विमानांसह उड्डाण संचालनासाठी बंद करण्यात आली होती. यामध्ये रनवेच्या ताकदीचे पुनर्मूल्यांकन देखील केले गेले आहे. या धावपट्टीचे पीसीएन मूल्य कोणत्याही पेलोड निर्बंधाशिवाय बहुतेक विमाने स्वीकारण्यासाठी योग्य असल्याचे आढळले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.