Nashik News : 'जल जीवन मिशनच्या कामात दिरंगाई कराल, तर याद राखा', सीईओ लीना बनसोड यांचे निर्देश
Nashik News : जल जीवन मिशन (Jal Jiwan Mission) कामांमध्ये अनियमितता आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा सीईओ लीना बनसोड (ZP CEO Leena Bansod) यांनी दिला आहे.
Nashik News : जल जीवन मिशन (Jal Jiwan Mission) कार्यक्रमांतर्गत सुरु असलेल्या कोणत्याही कामांमध्ये अनियमितता अथवा दिरंगाई आढळून आल्यास सर्व संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर जल जीवन मिशन मार्फत सुरु असलेल्या कामांबाबत महिन्यातून एक वेळा सर्व तालुक्यातील अहवाल जिल्हा स्तरावर सादर करावा, असे निर्देश नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड (ZP CEO Leena Bansod) यांनी केले आहेत.
जिल्हा परिषदेच्या (Nashik Zilha Parishad) नवीन सभागृहात ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण जिल्ह्यात पाणी पुरवठ्यासंबंधी सुरू असलेल्या कामांचा मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी यावेळी तालुका निहाय आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्याचबरोबर जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामात दिरंगाई करता कामा नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) पाणी पुरवठा संबंधी सुरू असलेल्या 476 योजनांमध्ये 100 टक्के नळ जोडणी करून एकही आदिवासी वाडी व वस्ती पाणी पुरवठ्यापासून वंचित राहू नये असे निर्देश दिले. जिल्ह्यात यावर्षी 1358 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासंबंधीची कामे प्रस्तावित आहेत. त्यामुळे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुरु असलेल्या कोणत्याही कामांमध्ये अनियमितता अथवा दिरंगाई आढळून आल्यास सर्व संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर जल जीवन मिशन मार्फत सुरु असलेल्या कामांबाबत महिन्यातून एक वेळा सर्व तालुक्यातील उप अभियंता यांनी कंत्राटदारांचा योजनानिहाय आढावा घेऊन प्रगतीपर अहवाल जिल्हा स्तरावर सादर करावा. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कार्यादेश दिलेल्या मक्तेदारानेच अथवा त्यांनी अधिकृत नेमणूक केलेल्या व्यक्तींनीच प्रत्यक्ष कामावर हजार राहतील याची दक्षता घ्यावी त्याचबरोबर कोणतेही काम इतर नोंदणीकृत नसलेल्या नसलेल्या मक्तेदारास दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंत्राटदाराचा मक्ता तात्काळ रद्द करण्यात येईल असे सांगितले.
जल जीवन मिशन कार्यक्रमाची प्रभावी अमंलबजावणी करण्याकरिता सर्व उप अभियंता व शाखा अभियंता यांनी वेळोवेळी आढावा घेऊन, योजनेची प्रत्यक्ष पाहणी करून कामात कोणत्याही प्रकारची तडजोड न होता कामे गुणवत्तापूर्वक व विहित मुदतीत पूर्ण होतील याबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या, जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कोणत्याही कामांना मुदतवाढ दिली जाणार नाही. दर तीन महिन्यांनी जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत आढावा सभेचे आयोजन ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून करण्याचे निर्देश दिले. यावेळी कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर सर्व तालुक्यातील उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता विनोद देसले, कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेंद्र पवार, प्रमोद निरगुडे, प्रदीप अहिरे, कौशल पात्रे, हर्षा पजई आदी अधिकारी व कर्मचारी यांच्यासह मक्तेदार उपस्थिती होते.