Nashik Congress : "जनतेसाठी एकमेव आश्वासक पक्ष, काँग्रेस म्हणू अन् काँग्रेस आणू"; नाशिकमधील फलक चर्चेत
Nashik Congress : नाशिक शहरात काँग्रेस पक्षाकडून 'काँग्रेस म्हणू आणि काँग्रेसच आणू,' अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत.
Nashik Congress Politics : राष्ट्रवादीतून (NCP) बाहेर पडून अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारची कास धरली. या राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकारणाचं चित्र बदलून गेलं आहे. यामुळे महाविकास आघाडीला देखील कुठेतरी तडा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच काँग्रेसने भरारी घेण्याची हीच वेळ असल्याचे देखील बोलले जात असताना नाशिकमध्ये (Nashik Congress) काँग्रेसच्या आश्वासक प्रतिसादाचे फलक शहरातील विविध भागात झळकत असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. कधी काय होईल, याचा नेम लावणंही अशक्य झालं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसेना, ठाकरे गट, काँग्रेस आदी पक्षही हालचाली करत असल्याचे चित्र आहे. या सर्व घडामोडीत काँग्रेसकडून (Congress) अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर नसल्याचे समजते आहे. मात्र स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण असल्याचे दिसत आहे. याचा प्रत्यय नाशिकमध्ये येत आहे. सध्या नाशिक शहरात काँग्रेस पक्षाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. यात 'काँग्रेस म्हणू आणि काँग्रेसच आणू' अशा आशयाचे फलक नाशिक शहरात झळकत असून हे फलक सध्या नाशिककर यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षाचं झाले असताना अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय भूकंप घडवून आणला. या राजकीय भूकंपांनंतर राज्यातील राजकीय स्थिती बदलली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीमुळे महाविकास आघाडीचे समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये काँग्रेसने सध्याच्या राजकीय परिस्थितीवर फलकाच्या माध्यमातून भाष्य केले आहे. 'जनतेसाठी एकमेव आश्वासक पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, 'काँग्रेस म्हणू आणि काँग्रेसच आणू' असे फलक शहरातील विविध मुख्य भागांवर लावण्यात आलेले आहेत. महात्मा गांधी रोडवरील काँग्रेस भवन, द्वारका, सारडा सर्कल, सिटी सेंटर मॉल, इंदिरानगर, जुने नाशिक आदी ठिकाणी लावण्यात आले आहेत.
भाजपकडून फूट पाडण्याचे काम
या फलकाच्या माध्यमातून सध्याच्या महाराष्ट्राच्या उलथापालथीच्या राजकारणावर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटण्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पक्षाकडून प्रसार केला जात आहे. दरम्यान, भाजपने फोडाफोडीचे राजकारण अवलंबले आहे. शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडण्याचे काम भाजपने केले आहे, हे नैतिक राजकारण मतदारांच्या पचनी पडलेले नाही. या परिस्थितीत केवळ काँग्रेसच मतदारांसाठी असल्याचा संदेश फलकाच्या माध्यमातून देत असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी सांगितले.