Maharashtra Assembly Elections 2024 : ठाकरे गटातील नेत्याची राजेश टोपेंविरोधात बंडखोरी, शिवाजीराव चोथे अचानक भुजबळांच्या दरबारी; घडामोडींना वेग
Maharashtra Assembly Elections 2024 : घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने राजेश टोपे यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) लढत होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. अनेक मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बंडखोरांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून सुरु आहे. त्यातच घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील (Ghansawangi Assembly Constituency) ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) भेटीला दाखल झाल्याचे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने राजेश टोपे (Rajesh Tope) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. घनसांगवी विधानसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत शरद पवार गटाच्या वाट्याला गेल्याने ठाकरे गटाचे शिवाजीराव चोथे यांनी बंडखोरी केली आहे. शिवाजीराव चोथे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यातच आज बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरु आहे. मात्र शिवाजीराव चोथे नाशिकमध्ये दाखल झाले असून भुजबळ फार्म येथे त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे.
छगन भुजबळांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो : शिवाजीराज चोथे
याबाबत शिवाजीराव चोथे म्हणाले की, मी घनसावंगीमधून अपक्ष निवडणूक लढवतोय. छगन भुजबळ यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. अंतरवाली सराटी माझ्या मतदारसंघात येत असलं तरी त्याचा संबंध नाही. भुजबळांशी माझे जुने संबंध आहेत. त्यामुळे मी आशीर्वाद घेण्यासाठी आलोय. मी ४० वर्षांपासून शिवसेनेत आहे. ही जागा शरद पवार गटाला सुटल्यामुळे शिवसैनिकांनी, नागरिकांनी आग्रह केला म्हणून मी निवडणूक लढवतोय. तालुक्यातील आमच्या सर्व निवडणुका राजेश टोपे यांच्या विरोधातच आहे. त्यामुळे मी निवडणूक लढवत आहे. मी अपक्ष उमेदवारी करतोय, बंडखोरी कायम आहे. माझ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. माझा पक्ष टिकला पाहिजे, मी अनवाणी फिरून पक्ष उभा केला आहे. तो पक्ष माझ्यासमोर ढासळत असताना मी गप्प कसा बसू? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या
सुनील शेळकेंचा गेम होणार?, मावळ पॅटर्नला राज ठाकरेंचाही मनसे पाठिंबा; बाळू भेगडेंनी घेतली भेट