सुनील शेळकेंचा गेम होणार?, मावळ पॅटर्नला राज ठाकरेंचाही मनसे पाठिंबा; बाळू भेगडेंनी घेतली भेट
बापू भेगडेंना मावळ भाजपने आधीचं पाठिंबा जाहीर केला आहे, अशातच आता सुनील शेळकेंच्या पराभवासाठी शरद पवारांनी सुद्धा डाव टाकलाय
पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोमाने सुरू असतानाचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे, बंडखोरांना शांत करण्याचा शेवटचा प्रयत्न दिग्गज नेते मंडळींकडून होत आहे. त्यातच, मुंबईतील बोरीवली मतदारसंघातून माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचा अर्ज मागे घेण्यासाठी भाजप नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, अखेर भाजपचे (BJP) सरचिटणीस विनोद तावडेंची शिष्टाई फळाला आली अन् गोपाळ शेट्टी अर्ज माघारी घेण्यासाठी तयार झाले आहेत. दुसरीकडे माहीम विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले असून शिवसेना महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनाही अर्ज मागे घेण्यासाठी बड्या नेत्यांकडून मनधरणी केला जात आहे. त्यातच, मावळ पॅटर्नला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) पाठिंबा दर्शवला आहे.
मावळ पॅटर्नला राज ठाकरेंनी ही पाठिंबा दर्शवला असून हा पॅटर्न सत्यात उतरवण्यासाठी भाजपाचे नेते बाळा भेगडेंनी स्वतः राज ठाकरेंची भेट घेतली. अजित पवारांचे शिलेदार सुनील शेळकेंच्या पराभवासाठी बाळा भेगडे मैदानात उतरले आहेत. बंडखोर बापू भेगडेंसाठी बाळा भेगडे जंग जंग पछाडत आहेत. शरद पवार गटासह सर्वपक्षीयांनी बापू भेगडेंना पाठिंबा दर्शवला आहे. अशातच बाळा भेगडेंनी राज ठाकरेंची भेट घेत, मनसेच्या पाठिंब्यावर शिक्कामोर्तब केल्याचा दावा केला जातोय. त्यामुळं शेळकेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
बापू भेगडेंना मावळ भाजपने आधीचं पाठिंबा जाहीर केला आहे, अशातच आता सुनील शेळकेंच्या पराभवासाठी शरद पवारांनी सुद्धा डाव टाकलाय. कारण, मविआच्या जागावाटपात मावळची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला होती. म्हणूनचं बंडखोर बापू भेगडेंनी शरद पवारांकडे पाठिंबा देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे शरद पवारांनीही या मागणीला संमती देत पाठिंबा देऊ केलाय. त्यामुळे, सुनिल शेळकेंच्या चांगल्याच अडचणी वाढल्या आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील काही नेते भेगडेंच्या प्रचारात सक्रिय झाले असून काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना ही भेगडेंना पाठिंबा देत शेळकेंना कोंडीत पकडत आहे. त्यामुळे, अजित पवारांच्या पठ्ठ्याला कोंडीत पकडण्यासाठी तयार झालेला मावळ पॅटर्न चांगलाच चर्चेत आला आहे. त्यातच, आता माजी मंत्री बाळा भेगडे यांनी राज ठाकरेंनी भेट घेऊन मावळ पॅटर्नमध्ये सहभागी होत पाठिंब्याची मागणी केल्याची चर्चा आहे. या पाठिंब्यामुळे सुनिल शेळकेंची मोठी अडचण होत आहे.
हेही वाचा
सदा सरवणकर कुठला तर्क लावताय? आम्ही अर्ज मागे घेण्यासाठी विनंतीच केली नाही, मनसेची आक्रमक भूमिका