Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
Manoj Jarange Patil : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह इतर आठ मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आजपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत.
Manoj Jarange Patil : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह इतर आठ मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. आज शनिवारी (दि. 25) मनोज जरांगे अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत.
मनोज जरांगे यांचे हे सातवे आमरण उपोषण असणार आहे. आज सकाळी 10 वाजता अंतरवाली येथे त्यांच्या उपोषणाला सुरवात होणार आहे. मी समाजासाठी लढत आहे, स्वतःसाठी नाही. चंद्र, सूर्य असेपर्यंत मी लढतच राहणार आहे. समाजाला कधीही सोडू शकत नाही. मुख्यमंत्री फडणवीस आम्हाला आरक्षण देणार आहेत. फडणवीस यांना मराठे मोठे व्हावे वाटतात की नाही ते आता उघड होणार आहे. मराठ्यांशी बेईमानी करणे त्यांना महाग पडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. तसेच ज्यांना उपोषणात सहभागी व्हायचे आहे त्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले आहे.
मनोज जरांगे यांच्या 8 प्रमुख मागण्या
1) महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच आहे. म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.
2) हैदराबाद गॅझेटिअर, सातारा संस्थान गॅझेटिअर, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर लागू करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी.
3) न्यायमूर्ती शिंदे समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू करावे. शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी.
4) सगे-सोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी. आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगे-सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी.
5) महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस सरसकट सर्वांच्याच मागे घेण्यात याव्यात. सर्व गुन्हे रद्द करण्यात यावे.
6) सरकारने 10 टक्के एसईबीसी आरक्षण लागू केले आणि मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केले ते ईडब्लूएस आरक्षण पुन्हा सुरू करावे.
7) कुणबी नोंदी शोधण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडीटी देण्यासाठी, जिल्हा व तालुकास्तरावर कक्ष स्थापन केले होते ते कक्ष पुन्हा तात्काळ सुरू करण्यात यावे. वंशावळ समिती, मोडी लिपी समिती व सर्व भाषेच्या अभ्यासकांची मोठी टीम तात्काळ नोंदी शोधण्यासाठी तयार करण्यात यावी.
8) महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती करणारा वर्ग म्हणजेच कुणबी आहे. ओबीसी क्रमांक 83 वर कुणबी आहे आणि 2004 सालचा अध्यादेश आहे. मराठ्यांची पोटजात-उपजात कुणबी आहे. म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे. हा सुधारित जीआर काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.
आणखी वाचा