Maharashtra Assembly Elections 2024 : दिंडोरीत महायुतीत मिठाचा खडा, नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, इच्छुक उमेदवार थेट शिंदेंच्या दरबारी
Dindori Assembly Constituency : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे.
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुतीत भाजपची पहिली उमेदवारी यादी (BJP Candidate List) काल जाहीर झाली. तर राष्ट्रवादी अजित पवार गट (NCP Ajit Pawar Group) आणि शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Group) यांची पहिली यादी लवकर जाहीर होणार आहे. त्यात आता विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari zirwal) यांच्या मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार धनराज महाले (Dhanraj Mahale) आणि त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे.
दिंडोरी विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. नरहरी झिरवाळ हे दिंडोरीचे विद्यमान आमदार आहेत. त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिंडोरीतील सभेत नरहरी झिरवाळ यांच्या नावाची घोषणा केली होती. यानंतर शिवसेनकडून नरहरी झिरवाळ यांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता.
दिंडोरीचा जागा कुणाला सुटणार?
आता पुन्हा एकदा दिंडोरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा ठोकला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या जागेवर शिवसेनेने दावा केल्याने महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे चित्र आहे. महायुतीत दिंडोरीची जागा शिवसेनेला मिळावी, या मागणीसाठी माजी आमदार धनराज महाले आणि त्यांच्या समर्थकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी धनराज महाले इच्छुक आहेत. इगतपुरी विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असल्याने दिंडोरीच्या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे. आता या मतदारसंघाची जागा नेमकी कुणाच्या वाट्याला येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या