Ladki Bahin Yojana : योजना शिंदेंची, मात्र नाशिकच्या लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'उद्धव ठाकरेच आमचे भाऊ'
Ladki Bahin Yojana : आमचा लाडका भाऊ उद्धव ठाकरेच, अशी घोषणाबाजी ठाकरे गटाच्या कार्यक्रमात करण्यात आली. येत्या काळात उद्धव ठाकरेंच्या पक्षालाच मतदान करणार असल्याचेदेखील उपस्थित महिलांनी म्हटले.
नाशिक : महायुती सरकारने (Mahayuti Government) यंदाच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (CM Ladki Bahin Yojana) घोषणा केली. या योजनेत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक मदत शासनाकडून दिली जात आहे. या योजनेचा पहिला हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना जरी शिंदे सरकारने सुरु केली असली तरी नाशिक येथे झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena UBT) कार्यक्रमात लाडक्या बहिणींनी आमचा लाडका भाऊ उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत, अशी घोषणाबाजी केल्याने शहरात या कार्यक्रमाची जोरदार चर्चा होत आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day 2024) सिडको भागात विविध कार्यक्रम पार पडले. परंतु माजी नगरसेविका किरण दराडे, बाळा दराडे यांच्या कार्यक्रमांची दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा होती. एकीकडे लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार (Ajit Pawar), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात श्रेयवादाची स्पर्धा सुरु असतानाच किरण दराडे व बाळा दराडे यांनी प्रभागातील सातशे ते आठशे महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मेळावा घेऊन सुविधा उपलब्ध करून दिली.
आमचा लाडका भाऊ उद्धव ठाकरेच
15 ऑगस्ट ला काही महिलांच्या खात्यावर पैसे देखील आल्याने महिलांनी ठाकरे गटाचे आभार मानले. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, पुंजाराम गामणे, बाळा दराडे यांना राखी बांधली. आमचा लाडका भाऊ उद्धव ठाकरेच, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. येत्या काळात मशालीलाच मतदान करणार असल्याचेदेखील यावेळी महिलांनी म्हटल्याने नाशिकला झालेल्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा होत आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी 199 कोटींच्या खर्चाला मंजुरी
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेला यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर देखील जोरदार प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसीठी मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या प्रसिद्धीसाठी 199 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत माध्यम आराखडा राबविण्यास व त्याकरिता होणाऱ्या 199 कोटी 81 लाख 47 हजार 436 रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे.
आणखी वाचा