मोठी बातमी : दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी, जे पी गावित लोकसभा लढवण्यावर ठाम
J P Gavit : माकपचे माजी आमदार जे. पी. गावित हे दिंडोरीतून लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. उद्या दिंडोरीमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेतून ते आपली भूमिका स्पष्ट करतील.
Dindori Lok Sabha Election 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून (BJP) पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. मात्र आता दिंडोरी मतदारसंघावर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी होण्याची शक्यता आहे.
माकपचे माजी आमदार जे. पी. गावित (J P Gavit) हे दिंडोरीतून लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. उद्या दिंडोरीमध्ये (Dindori News) त्यांची जाहीर सभा होणार आहे. शेतकरी संवाद सभा घेऊन ते आपली भूमिका मांडणार आहेत. जे पी पवार जाहीर सभेतून नक्की काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिंडोरीमध्ये होणार तिरंगी लढत
जे पी गावित यांच्या भूमिकेमुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांची डोकेदुखी वाढणार आहे. आता दिंडोरीमध्ये तिरंगी लढत होणार आहे. भारती पवार, भास्कर भगरे आणि जे पी गावित असा सामना होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
...म्हणून नाराज गावित निवडणुकीच्या रिंगणात
दरम्यान, माकपचे नेते माजी आमदार जे. पी. गावित यांनी सातत्याने भाजपच्या (BJP) विरोधात लढा दिला आहे. महाविकास आघाडीच्या प्रत्येक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघ माकपला मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात ती मागणी मान्य झालेली नाही. त्यामुळे आता नाराज गावित हे आता निवडणूक लढवणार आहेत.
कोण आहेत जे पी गावित?
जे पी गावित हे सुरगाणा व कळवण येथून तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१४ मध्ये त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष नेमण्यात आले होते. गावित हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत. व महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेतील एकमेव डाव्या गटातील सदस्य आहेत.