Governor Ramesh Bais : "वेळेचे योग्य नियोजन हाच यशस्वी जीवनाचा मंत्र"; राज्यपाल रमेश बैस यांचे नाशकात वक्तव्य
Governor Ramesh Bais : राज्यपाल रमेश बैस शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर होते. संदीप विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
Governor Ramesh Bais in Nashik नाशिक : राज्यपाल रमेश बैस शुक्रवारी नाशिक (Nashik) दौऱ्यावर होते. नाशिकला दाखल होताच त्यांनी पंचवटीतील काळाराम मंदिराचे (Kalaram Mandir Nashik) दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते विधिवत आरती आणि पूजा विधी पार पडला. त्यानंतर संदीप विद्यापीठाचा (Sandip University) प्रथम दीक्षांत समारंभास राज्यपालांनी हजेरी लावली.
या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, वेळ हा विद्यार्थ्यांचा चांगला मित्र आहे. त्यामुळे वेळेचा कार्यक्षमतेने वापर करून योग्य नियोजन केल्यास जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते. ज्ञानाचा विस्तार करण्यासह उद्दिष्टे निश्चित करणे, कौशल्ये सुधारणे, संधीचा वापर करण्यासाठी आतापासूनच वेळेचे नियोजन करावे, असा त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
तरुणपिढी करणार भारताचे नेतृत्व
आपल्या देशाचे भविष्य तरुणांच्या हाती आहे. ही तरुणपिढी उद्याच्या भारताचे नेतृत्व करणार असून आज मिळालेल्या पदवीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तुत्व गाजवणार आहे. संदीप विद्यापीठातून पदवी घेवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि विद्यापीठावर देश घडविण्याची मोठी जबाबदारी आहे.
आव्हानांना संधी म्हणून स्वीकारा
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. भारताच्या सुवर्ण युगाची सुरुवात करण्यात आजची ही युवा पिढी महत्वाची भूमिका बजावणार, यात काही शंका नाही. आज विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधण्यासाठी विविध क्षेत्रांची कवाडे खुली झाली आहेत. विद्यार्थ्यांची मेहनत आणि अभ्यासाप्रती असलेले समर्पण आज ज्या स्थानावर घेऊन गेले आहे. याचे श्रेय विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या प्राध्यापक आणि पालकांना जाते. आता, तुम्ही सर्व करिअरच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहात. प्रत्येक दिवस नवीन आव्हाने आणि नवीन धडे घेऊन येईल. ही आव्हाने संधी म्हणून स्वीकारण्यास सज्ज व्हा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांना केले.
नवीन शैक्षणिक धोरण विचारांच्या समृद्ध परंपरेवर आधारित
विद्यार्थ्यांमधील क्षमता, कौशल्ये आणि ज्ञान जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचे जतन करणे आवश्यक आहे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी करिअरसोबतच मानसिक आरोग्याची ही काळजी घ्या. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० देशाच्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे बनवले गेले आहे. या शैक्षणिक धोरणाने आकांक्षी उद्दिष्टांसह विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि पुनर्रचना करण्यात आली आहे. हे नवे शैक्षणिक धोरण प्राचीन आणि शाश्वत भारतीय ज्ञान आणि विचारांच्या समृद्ध परंपरेवर आधारित आहे. भारतीय विचार परंपरा आणि तत्वज्ञानात ज्ञान, शहाणपण आणि सत्याचा शोध हे नेहमीच सर्वोच्च मानवी ध्येय मानले गेले आहे.
लर्न मोर ॲण्ड अर्न मोर
संदिप विद्यापीठाचे चेअरमन संदिप झा म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ परिक्षेतच विशेष प्राविण्य प्राप्त केले नसून इतर सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमातही आपला सहभाग नोंदविला आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यात ध्रुव ताऱ्याप्रमाणे आपले स्थान निश्चित करावयाचे आहे. जेणे करून आपला आदर्श इतरांना मार्गदर्शक ठरेल. प्रत्येकात एक विशिष्ठ गुणवत्ता असते, तिचा विकास करणे हे आपल्या हातात आहे. त्यासाठी मेहनत व नाविन्यपूर्ण गोष्टी शिकण्याची उमेद आवश्यक आहे. भावी आयुष्यात काम करतांना त्यातून आनंद मिळवणे देखील महत्वाचे असते. लर्न मोर ॲण्ड अर्न मोर हा मुळ मंत्र लक्षात ठेवून उज्वल प्रगती करा, असे ते म्हणाले.
विद्यापीठाचे उप कुलसचिव बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना पदवीदानाची शपथ दिली. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात राज्यपाल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी व सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. यावेळी संदीप विद्यापीठाचे कुलगुरू पंडित नित्यानंद झा, उप कुलगरु डॉ. राजेंद्र सिंन्हा, माजी खासदार प्रभात झा, अलोक झा, आर्यन झा यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Governor Ramesh Bais in Nashik : राज्यपाल रमेश बैस नाशिक दौऱ्यावर; प्रभू श्रीरामाचे घेतले दर्शन