Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट! मनसेच्या दाव्यानंतर एकनाथ शिंदे-भुजबळांची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
Lok Sabha Election 2024 : मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या बैठकीत नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
Nashik Lok Sabha Constituency : काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा जाहीर केल्या. लवकरच निवडणुका पार पडणार आहेत. महायुतीत अजूनही काही जागांवरून तिढा कायम आहे. नाशिक लोकसभेबाबत महायुतीत आधीच शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. आता मनसे भाजपची युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा करण्यात आली. मनसेकडून एकूण तीन जागांचा प्रस्ताव देण्यात आल्याचे वृत्त आहे. यात दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मनसेची भाजपसोबत युती झाली आणि नाशिकची जागा मनसेला सुटली तर महायुतीच्या इच्छुकांचा हिरमोड होणार आहे.
एकनाथ शिंदे-छगन भुजबळ भेट
खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी नाशिक येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात हेमंत गोडसे (Hemant Godse) हेच नाशिक लोकसभेचे (Nashik Lok Sabha Election) उमेदवार असतील अशी घोषणा केली होती. यामुळे नाशिकच्या इच्छुकांमध्ये नाराजी होती. आता मनसेच्या एन्ट्रीमुळे स्थानिक पातळीवर डोकेदुखी वाढली. यावर चर्चा सुरु असतानाच मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे.
नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसेच?
या बैठकीत नाशिकच्या जागेवरून चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. शिंदे सेनेची जागा असताना, भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार गटानेही दावा केला आहे. त्यात मनसेच्या (MNS) महायुतीतील एन्ट्रीनंतर ट्विस्ट आला असून, मनसेनेही नाशिकच्या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे तिघांच्या भांडणात चौथ्याचा लाभ होण्याची शक्यता असतानाच, भुजबळ आणि शिंदेंच्या भेटीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. गोडसे यांना मदत करण्याचे आवाहन शिंदे यांनी भुजबळांना केल्याचे समजते. त्यामुळे नाशिकची जागा हेमंत गोडसेंनाच मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता नक्की नाशिकच्या जागेवर उमेदवार कोण असणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
मराठवाड्यात भाजपची मोठी खेळी! शिंदेसेनेला फक्त एकच जागा मिळणार?; संभाजीनगरही भाजपकडेच