(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dindori Earthquake : नाशिकच्या दिंडोरी परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिक भीतीच्या सावटाखाली!
Dindori Earthquake : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे तीन सौम्य धक्के बसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.
Dindori Earthquake : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा आदी भागांत काही दिवसांपूर्वी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर आता दिंडोरी (Dindori) तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे (Earthquake) तीन धक्के बसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील विविध गावांना हे धक्के काल (16 ऑगस्ट) रात्री जाणवले आहेत. नाशिकच्या मेरी येथील भूकंप मापक यंत्राच्या अहवालानुसार रात्री 08 वाजून 58 मिनिटांनी, 09 वाजून 34 मिनिटांनी आणि 09 वाजून 42 मिनिटांनी असे तीन भूकंपाचे धक्के जाणवले. या सौम्य धक्क्यांची तीव्रता अनुक्रमे 3.4, 2.1 आणि 1.9 असून नाशिक वेधशाळेपासून 16 ते 20 किलोमीटर अंतरावर दिंडोरी तालुक्यामध्ये असण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने माहिती दिली आहे.
दिंडोरी तालुक्यातील, दिंडोरी शहर, मडकीजांब, हातनोरे, निळवंडी, जांबुटके, उमराळे (बु), तळेगाव येथे भूकंपाचे धक्के बसल्याची प्राथमिक माहिती हाती येत आहे. नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर काहीतरी आवाज होऊन जमिनीला हादरे बसल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. परिसरात सर्वात जास्त हादरे जांबुटके गावात बसत सांगण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
भूकंपाचे तीन सौम्य धक्के
मेरी येथील भूकंप मापक यंत्राचे अहवालानुसार मंगळावारी रात्री 08.58 मिनिटांनी, 09.34 मिनिटांनी आणि 09.42 मिनिटांनी असे तीन भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. या सौम्य धक्क्यांची तीव्रता अनुक्रमे 3.4, 2.1 आणि 1.9 असून नाशिक वेधशाळेच्या पासून 16 ते 20 किलोमीटर अंतरावर दिंडोरी तालुक्यामध्ये असण्याची शक्यता आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने माहिती दिली आहे.
नागरिकांनी घाबरुन जाऊ नये!
दिंडोरी तालुक्यात विविध गावांना भूकंपाचा सौम्य धक्का बसला असून याबाबत मेरी येथील संशोधन केंद्रात त्याबाबत कोणतीही नोंद नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कळते. याबाबत नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरुन जाऊ नये असे आवाहन तहसीलदार पंकज पवार यांनी केले आहे.
नेमके कारण काय?
पृथ्वीच्या भूगर्भात टेक्टॉनिक प्लेट्सच्या तणावामुळे दाब मुक्त होण्यासाठी होणाऱ्या हालचाली आणि एकमेकांवर घर्षणाने भूकंप होतात. जगभरात भूकंप मापन केंद्र दरवर्षी भूकंपाचे साधारण 20 हजार झटके नोंदवते. धरणातील पाण्याच्या दबावाने देखील कोयनासारख्या धरण परिसरात भूकंप होतात. भूकंप ही टाळता न येणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय हवामान शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या